प्रख्यात अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांचे निधन
schedule16 Sep 25 person by visibility 558 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संशोधनाच्या माध्यमातून देशाची मान उंचाविणारे, प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम बाबूराव भोजे यांचे मंगळवारी (१६ सप्टेंबर २०२५) रोजी निधन झाले. त्यांच्या संशोधन आणि विकासातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना, पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचा विविध पुरस्कारांनी गौरव झाला होता. डॉ. भोजे हे मूळचे कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील. गेली अनेक वर्षे ते कोल्हापुरात स्थायिक होते. त्यांना थकवा जाणवत असल्यामुळे उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचार घेऊन ते घरी परतले होते. सायंकाळी पाच वाजता त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ८२ वर्षाचे होते.
सेवानिवृत्तीनंतर त्यांचा विविध शैक्षणिक संस्थांशी संबंध होता. शिवाजी विद्यापीठाचे ते शैक्षणिक सल्लागार होते. डॉ. भोजे यांचे विशेष उल्लेखनीय कार्य म्हणजे, चाळीस वर्षे वेगवान ब्रीडर अणुभट्टी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सक्रिय होते. डिझाइन, बांधकाम, ऑपरेशन, संशोधन आणि वकास क्षेत्रात भरीव काम केले आहे.भोजे यांनी भाभा अणुसंशोध्न केद्र प्रशिक्षण शाळेत प्रशिक्षण पूर्ण केले होते. ट्रॉम्बे येथील बीएआरसी येथे वैज्ञानिक अधिकारी म्हणून छाप पाडली होती. एक मेगावॅटच्या वेगवान ब्रीडर टेस्ट अणुभट्टीच्या डिझाइन टीमचे सदस्य होते. या टीमचे सदस्य म्हणून त्यांची फ्रान्स येथील उशपीशी या ठिकाणी ते एका वर्षाच्या प्रतिनियुक्तीवर होते. अणुशास्त्रज्ञ म्हणून इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटोमिक रिसर्चचे संचालक होते. भारतीय नाआभिकी विद्युत निगम लिमिटेडचे संस्थापक संचालक होते.
डॉ. भोजे यांचा जन्म ९ एप्रिल १९४२ रोजी झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण कसबा सांगाव येथे झाले. काही काळ ते कागलमध्ये शिकायला होते. त्यांनी उच्च शिक्षण राजाराम कॉलेजमध्ये घेतले. पुढे अणुशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी देशासाठी मोठे योगदान दिले. संशोधक, शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा मोठा लौकिक होता. सेवानिवृत्तीनंतर ते कोल्हापुरात स्थायिक झाले. राजाराम रायफल्स परिसरातील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.