तरुणीशी अश्लिल वर्तन प्रकरण, चौकशीसाठी विशाखा समितीकडे ! कार्यालयीन अधीक्षकालाही नोटीस !!
schedule08 Oct 25 person by visibility 302 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मुख्यमंत्री युवा कौशल्य कार्यक्रमतंर्गत जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या तरुणींशी अश्लिल वर्तन प्रकरण चौकशीसाठी विशाखा समिती अर्थात विभागीय महिला तक्रार निवारण समितीकडे सोपविली आहे. तरुणींने केलेल्या तक्रारीनुसार जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक निलेश म्हाळुंगेकर यांना निलंबित केले आहे. तसेच या प्रकरणी संबंधित तरुणीची तक्रार थांबविणे व वरिष्ठांना या प्रकरणाची माहिती न देणे या कारणावरुन माध्यमिक शिक्षण विभागातील कार्यालयीन अधीक्षक संजय गावडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश यादव यांनी दिली.
निलंबित कनिष्ठ सहायक म्हाळुंगेकर यांना निलंबन कालावधीत आजरा पंचायत समिती येथे हजेरी देणे बंधनकारक केले आहे. दुसरीकडे म्हाळुंगेकर यांनी आठ व नऊ ऑक्टोबर २०२५ या दोन दिवसासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडे रजेचा अर्ज पाठविला आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने यासंदर्भातील माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना दिली आहे. संबंधित तरुणींनी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलिस अक्षीक्षकांकडे २९ सप्टेंबर रोजी तक्रार दिली आहे. त्या तक्रारीत, कनिष्ठ सहायक म्हाळुंगेकर यांच्याविषयी तक्रारी आहेत.
अश्लिल व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे तक्रारीत संबंधित तरुणींने म्हटले आहे. त्यांनी पहिल्यांदा यासंबंधी माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालयीन अधीक्षक संजय गावडे यांच्याकडे तक्रार दिली होती. त्यावेळी गावडे यांनी संबंधित तरुणीला तक्रार करण्यापासून थांबविण्याचे काम केले. तसेच या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली नाही असे चौकशीत समोर आले आहे. या कारणास्तव गावडे यांच्यावर कारवाई का करू नये अशी नोटीस बजावली आहे. गावडेंना तेरा ऑक्टोबरपर्यंत खुलासा सादर करण्याविषयी कळविले आहे. दरम्यान अश्लिल वर्तन प्रकरणी सीईओ, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालय व राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान जिल्हा परिषदेने नेमलेल्या चार सदस्यीय चौकशी समितीचे प्रमुख उपमुख्य वित्त व लेखाधिकारी अरुणा हासबे आहेत. या चौकशी समितीत स्वच्छता व पाणी पुरवठा संचालक माधुरी परीट, संजय जाधव यांचा समावेश आहे.