अतिवृष्टीमुळे बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अठरा कोटीहून अधिक निधी प्राप्त – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
schedule08 Oct 25 person by visibility 62 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी १८ कोटी ३० लाख ४० हजार रुपये अनुदान जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहे. अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. शासन जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या मदतीच्या अनुषंगाने शुक्रवार दि.10 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आढावा घेणार आहेत.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ३८२ गावांमध्ये १२,१२५. ५७हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या आपत्तीमुळे ४७ हजार ९०३ शेतकरी बाधित झाले असून या शेतकऱ्यांसाठी १८ कोटी ३० लाख ४० हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. यापैकी १२,१८४ शेतकऱ्यांना सहा कोटी ६१ लाख ९० हजार रुपये वितरित झाले आहेत. ८०६ शेतकऱ्यांच्या खात्यात ४५ लाख ९० हजार रुपये जमा झाले आहेत. तथापि, ११,३०६ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित असून सहा कोटी ११ लाख ७६ हजार रुपयांचे अनुदान देय आहे. प्रलंबित शेतकऱ्यांनी आपले ई-केवायसी तत्काळ करुन घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे ७१९ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. आपत्तीत सात जण मृत्यूमुखी पडले आहहेत. मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी 4 लाख रुपयांप्रमाणे वारसांना मदत वितरित करण्यात आली आहे. स्थलांतरित कुटुंबांपैकी १८७ कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे अठरा लाख सत्तर हजार रुपये वितरित करण्यात आले असून उर्वरित ५३२ कुटुंबांना अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. पालकमंत्री आबिटकर यांनी संबंधित विभागांना तातडीने मदत वाटपाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व शेतकऱ्यांचे ई-केवायसी त्वरित पूर्ण करून मंजूर अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यावर भर देण्याचे आदेशही दिले.