ग्रंथालये ग्रंथांचे घर नव्हे तर वाचन मंदिरे व्हावीत – प्राचार्य जी. पी. माळी
schedule08 Oct 25 person by visibility 78 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ग्रंथालय म्हणजे केवळ ग्रंथांचे घर नव्हे, ते वाचनाचे मंदिर आहे. जसा भक्त देवालयात भक्तीभावाने जातो, तसाच वाचक ग्रंथालयात गेला पाहिजे. आपल्या घरात चारचाकी गाड्या, फर्निचर आणि आलिशान वस्तू आहेत, पण पुस्तकांचं कपाट आहे का? विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीकडे वळविणे हे एक मोठे आव्हान आहे.’ असे प्रतिपादन प्राचार्य जी. पी. माळी यांनी केले.
येथील महावीर महाविद्यालयातील मराठी विभाग आयोजित मराठी वाङ्मय मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी वाङ्मय मंडळ कार्यकारिणी फलकाचे अनावरण करण्यात आले.
प्राचार्य माळी म्हणाले, ‘मराठी वाङ्मय, ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, साने गुरुजींचं ‘श्यामची आई’ अशी पुस्तकं प्रत्येक मराठी घरात असली पाहिजेत.’ भाषणात त्यांनी प्रसिद्ध लेखक रणजित देसाई यांच्या संवेदनशीलतेचा एक प्रसंग सांगितला. एका मोलकरीण वाचिकेने ‘स्वामी’ आणि ‘श्रीमान योगी’ या कादंबऱ्या सवलतीच्या दरात मागवल्या. तेव्हा देसाईंनी त्या दिवाळीचं ओवाळणं म्हणून त्या साहित्यकृती भेट दिल्या. ही मराठी साहित्याची खरी आपुलकी आहे.
प्राचार्य जोशी म्हणाले, ‘मराठी वाङ्मय मंडळ हे केवळ साहित्य मंच नसून विद्यार्थ्यांच्या भाषिक, सांस्कृतिक आणि सर्जनशील जाणीवा घडविणारी प्रयोगशाळा आहे. वाचन, चिंतन आणि मनन यांची सवय लावली, तर मराठी भाषेचा अभिजात दर्जा अधिक उजळेल.’ मराठी विभागप्रमुख प्रा. जयवंत दळवी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. (डॉ.) गोमटेश्वर पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.डॉ. सुप्रिया आवारे आणि सबिया नालबंद यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञानेश्वरी कुरळे यांनी आभार मानले. समारंभास डॉ. शरद गायकवाड, डॉ. महादेव शिंदे. प्रा. विष्णू चव्हाण, आणि स्नेहल अलकांदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.