पुणे पदवीधर-शिक्षक आमदारकीसाठी भाजपा मैदानात ! पुण्यातील मेळाव्यात ठरला मतदार नोंदणीचा कार्यक्रम! !
schedule29 Sep 25 person by visibility 235 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डिसेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या पुणे पदवीधर व शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सह-संघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व उच्च-तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे येथे सोमवारी (२९ सप्टेंबर २०२५) पश्चिम् महाराष्ट्रातील भाजपा पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला.
या मेळाव्याच्या केंद्रस्थानी पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार नोंदणीचा कार्यक्रम हा विषय होता. याप्रसंगी मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी ‘जास्तीत जास्त मतदार नोंदणी करा. उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. मात्र मतदार नोंदणी इतकी उच्चांकी करा की, उमेदवारी घोषित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणतीही अडचण येऊ नये.’ असे आवाहन केले.
मंत्री माधुरी मिसळ, खासदार मेधा कुलकर्णी, खासदार धनंजय महाडिक, आमदार विक्रांत पाटील, आमदार अतुल भोसले, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार समाधान आवताडे, विभागीय संघटनमंत्री मकरंद देशपांडे, मतदार नोंदणी प्रमुख राजेश पांडे, सहनोंदणीप्रमुख राहुल चिकोडे, विक्रम देशमुख, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राजवर्धन निंबाळकर, सांगलीचे प्रकाश ढंग, सम्राट महाडिक आदींसह पाच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आवश्यक रणनितीबाबत मार्गदर्शन केले. या निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्याविषयी मार्गदर्शन केले. मतदार नोंदणीसाठी विशेष कार्यक्रम राबवावा, कॉलेज-शाळापर्यंत पोहोचून मतदार नोंदणी करावी असे आवाहन नेतेमंडळींनी केले.