टीईटी पेपर फुटीत सिनीअर कॉलेजचा प्राचार्य, प्राध्यापक ! संस्था, जेडी ऑफिस, विद्यापीठाच्या अॅक्शनकडेही लक्ष ! !
schedule26 Nov 25 person by visibility 70 categoryशैक्षणिक
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) पेपर फुटी प्रकरणी पोलिस तपासात नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. अटक केलेल्या १८ जणांमध्ये एक जण सिनीअर कॉलेजचा प्रभारी प्राचार्य आहे, तर एक जण सिनीअर कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. तर दोघे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील प्राध्यापक आहेत. त्या प्राध्यापकांची पडताळणी करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसहसंचालक कार्यालयाला पाठविला आहे. शिक्षण सहसंचालक कार्यालयाचा कारभार हा उच्च शिक्षणाशी निगडीत आहेत. यामुळे पेपर फुटीत सिनीअर कॉलेजमधील प्राचार्य व प्राध्यापकांचा सहभाग पोलिस तपासात समोर आल्यामुळे संबंधितांच्या विरोधात आता संस्था, कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालय आणि शिवाजी विद्यापीठ काय अॅक्शन घेणार याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील दोघे सापडल्याने त्यांच्यावर शिक्षण उपसंचालक कार्यालय व शिक्षण विभाग काय कारवाई करायला भाग पाडणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
टीईटी पेपर फुटीत सापडलेले हे चौघे राधानगरी व कागल तालुक्यातील आहेत. ज्युनिअर कॉलेजशी संबंधित दोघे एकाच संस्थेत काम करतात. तर प्रभारी प्राचार्य हे राधानगरी तालुक्यातील सोळांकूर येथे कार्यरत आहेत. तर सिनीअर कॉलेजमधील प्राध्यापक हा मिरज येथे नोकरी करत होता. हे सगळे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दुसरीकडे शिक्षण विभागाने त्यांच्या संदर्भातील माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून पडताळणी अहवाल मागविल्यानंतर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालय त्या प्राध्यापकांची नावाची शहानिशा करुन संबंधित संस्थेकडून माहिती मागविणार आहे. गुन्ह्यात सहभाग आणि पोलिस कारवाई यावरुन संबंधितावर संस्थेने काय कारवाई केली हे तपासले जाणार आहे. संस्थेने कारवाई केल्यानंतर त्याचा अहवाल शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे सादर करावा लागतो. तसेच विद्यापीठ प्रशासनाही संबंधित संस्थेला याप्रकरणी कारवाईबाबत विचारणा करू शकते.
मुरगूड पोलिस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखेने पेपर फुटीचा पर्दाफाश केला. पेपर फुटण्याअगोदरच पोलिसांनी छापा टाकून रॅकेट उद्धवस्त केले. दरम्यान गेल्या चार दिवसात झालेल्या कारवाईत १८ जणांना अटक होऊन पहिले दोन दिवस पोलिस कोठडी, नंतर दोन दिवस न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. पेपर फुटी प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्राचार्य, प्राध्यापक व ज्युनिअर कॉलेजशी निगडीत शिक्षक असल्यामुळे शिक्षण विभागाकडून सध्या त्यांची पडताळणी सुरू आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे मागविलेल्या अहवालात एकूण तिघांची माहिती मागविल्याचे वृत्त आहे. यापैकी राधानगरी तालुक्यातील सोळांकूर येथील एक प्रभारी प्राचार्य आहेत. रसायनशास्त्र विषयाचे ते प्राध्यापक आहेत. बारा, तेरा वर्षे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. पेपर फुटीत राधानगरी तालुक्यातील आणखी एक प्राध्यापक सहभागी होता हे समोर आले आहे. हा भूगोल विषयाचा प्राध्यापक आहे. हा प्राध्यापक मिरज येथे नोकरीला होता. तर आणखी दोघे सापडलेले शिक्षक हे तालुक्यातील कारखाना व्यवस्थापनाकडून चालविल्या जाणाऱ्या विद्यानिकेतनमधील असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे येत आहे.