भर पावसात शिक्षकेतर सेवकांचे आंदोलन ! सरकार कधी दखल घेणार ?
schedule19 Aug 25 person by visibility 12 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिक्षकेतर सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर सोमवारी (१९ ऑगस्ट) आंदोलन झाले. दुपारी एक ते तीन या वेळेत झालेल्य आंदोलनात सेवकांनी पावसाची तमा न करता सहभाग घेतला.या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता. शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांना निवेदन दिले. शिक्षकेतर सेवक संघाचे अध्यक्ष बाबा पाटील म्हणाले, ‘सरकारने कर्मचारी भरती बंदीबाबतचा आदेश मागे घ्यावा, आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे लागू करावा. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सरकारी शिक्षण विभागासही आश्वासित प्रगती योजना लागू करावी या मागण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. यापूर्वी विविध माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले आहे. सरकार कधी लक्ष देणार ? सरकारने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन न्याय द्यावा.’ शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन कालावधीत जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. शिक्षण उपसंचालकांना निवेदन दिले. याप्रसंगी आमदार जयंत आसगावकर, दादा लाड, खंडेराव जगदाळे, सुरेश संकपाळ, दत्ता पाटील, श्रीकांत पाटील, भरत रसाळे, राजेंद्र कोरे आदी उपस्थित होते.