पीएन गटाची नवी घोषणा –निष्ठा तीच अध्याय नवा ! सडोली खालसाच्या माळावरुन होणार नवीन राजकीय प्रवास !!
schedule18 Aug 25 person by visibility 310 categoryराजकीय
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : दिवंगत आमदार पी. एन. पाटील गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे राजेश पाटील यांच्यासह पीएन गटाचे प्रमुख पदाधिकारी, समर्थक व कार्यकर्ते यांचा प्रवेश निश्चित आहे. दिवंगत आमदार पी. एन. यांच्या पार्थिवावर सडोली खालसा येथे ज्या ठिकाणी अंत्यविधी करण्यात आले होते, त्या माळावर दुपारी बारा वाजता नवा राजकीय अध्याय सुरू होणार आहे.
राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर पीएन पाटील गटाने जय्यत तयारी सुरू केली आहे. ‘आदेश जनतेचा …नवीन प्रवास जनादेशासोबत’या आशयाचे स्टेटस सध्या झळकत आहेत. ‘निष्ठा तीच-अध्याय नवा : सदैव भैय्यासोबत’ म्हणून गट एकसंध असल्याचे दाखविले जात आहे. विधानसभा निवडणुकीचा पराभव पीएन गटाच्या जिव्हारी लागला आहे. पीएन गटाकडून विधानसभेच्या निकालाची आकडेवारी मांडली.अटीतटीची लढत झाली. हातातोंडातील विजयास घास हिरावल्याने कार्यकर्ते दुखावले. विधानसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यापासून राहुल पाटील यांच्या इतर पक्षातील पक्ष प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. कधी भाजपात जाणार तर कधी राष्ट्रवादीत जाणार अशा चर्चा होत्या.
दरम्यान राहुल पाटील व राजेश पाटील यांनी करवीर, राधानगरी मतदारसंघाचा दौरा केला. पीएन गटाच्या समर्थकांची, कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. कोणत्या पक्षात प्रवेश करायचा, भविष्यकालीन राजकीय वाटचाल, कारखान्याला उभारी, कार्यकर्त्यांचा सन्मान अशा विविध मुद्यावर चर्चा झाली. नव्या राजकीय प्रवासात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पर्याय निवडावा यावर साऱ्यांचे एकमत ठरले. राहुल पाटील, राजेश पाटील यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा झाली. तीन दिवसापूर्वी, उपमुख्यमंत्री पवार हे सांगली दौऱ्यावर होते. त्यावेळी कोल्हापूर विमानतळ येथेही राहुल पाटील त्यांच्यासोबत दिसले. उपमुख्यमंत्री पवार यांनी २५ ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी दौऱ्यावर येत असल्याचे सांगितले. यादिवशी पीएन पाटील गटाचा राष्ट्रवादीतील प्रवेश हा निश्चित मानला जात आहे.
अजून आठवडाभराचा कालावधी आहे. दरम्यान करवीर आणि राधानगरीतील पीएन समर्थकांचे स्टेटस झळकू लागले आहेत. पीएन यांना मानणारा मोठा वर्ग दोन्ही तालुक्यासह जिल्ह्यात आहे. हा सारा गट नव्या राजकीय वाटचालीत सोबत राहावा यादृष्टीने बांधणी सुरू आहे. समर्थकांनी ‘निष्ठा तीच-अध्याय नवा : सदैव भैय्यासोबत’ अशी साद घालत राहुल पाटील, राजेश पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्धार केला आहे.