डॉ. राजेंद्र हिरेमठ यांना घाळी समाजभूषण पुरस्कार
schedule19 Aug 25 person by visibility 14 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गडहिंग्लज येथील विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक डॉ. एस. एस. घाळी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा ‘डॉ. घाळी समाजभूषण पुरस्कार’ यंदा पुणे येथील भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ सीओईपी व जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॅ.राजेंद्र हिरेमठ यांना जाहीर झाला. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी (२४ ऑगस्ट २०२५) रोजी पुरस्कार वितरण सोहळा आहे. दुपारी तीन वाजता डॉ. घाळी सभागृहात पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे अशी माहिती विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. रोख २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. हिरेमठ हे मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे येथील आहेत. हिरेमठ यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. शिक्षण, आरोग्य क्षेत्रासह नव उद्योजकांना मार्गदर्शन केले आहे. सरकारच्या विविध समित्यावर तज्ज्ञ म्हणून काम केले आहे. सिर्जी कन्स्टल्टंट कंपनीतर्फे कमीतकमी वेळेत ८० किलो मीटर लांबीचा रस्ता केल्याबद्दल कुशल मार्गदर्शक म्हणून त्यांचा गौरव झाला आहे. पत्रकार परिषदेला संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी, संचालक महेश घाळी, किशोर हंजी, प्राचार्य डॉ. दत्ता पाटील, प्रा. शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.