कोल्हापूरकरांची अभिमानाने फुललेली छाती, शाहूनगरीच्या प्रेमाने भारावलेले सरन्यायाधीश ! !
schedule17 Aug 25 person by visibility 353 categoryसामाजिक

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : तुडुंब भरलेले मैदान, पाय ठेवायलाही शिल्लक नसलेली जागा, अधूनमधून बरसत असलेल्या सरी…मात्र कोल्हापूरकरांना ना पावसाची फिकीर, ना गर्दीची. .. साऱ्यांना एकाच गोष्टीची आस लागलेली… एक नाही-दोन नाही, तब्बल चार दशकाच्या संघर्षानंतर होत असलेली स्वप्नपूर्ती…यामुळे प्रत्येकाची छाती अभिमानाने फुललेली…या सोनेरी क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी साऱ्यांच्या नजरा व्यासपीठाकडे खिळलेल्या…घडयाळाचा काटा पुढे सरकत होता…सायंकाळी साडेचार वाजण्याचा सुमार… मुंबई हायकोर्टाचे कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन…ही अक्षरे दिमाखात झळकली अन् आपसूकच ‘याजसाठी केला होता अट्टाहास…आज सोनियाचा दिनु उगवला…’ हा भाव प्रकटला. हे चित्र होते, मेरी वेदन मैदान येथील. निमित्त घडलं, मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटन सोहळयाचे !
सर्किट बेंचच्या उद्घाटनाचा हा समारंभ मनाच्या कोंदणात कायमस्वरुपी जपून ठेवण्यासारखा. या सुखद क्षणांच्यासोबतीने कोल्हापूरकरांना भावला तो सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा साधेपणा, विनम्रता आणि कोल्हापूरविषयी विशेषत : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयीचा कृतज्ञतेचा भाव. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणजे खरं तर, खूप मोठी असामी. मात्र गवई यांनी शनिवार आणि रविवार या दोन दिवसाच्या कोल्हापूर दौरयात एकदाही त्या पदाचा बडेजाव मिरवला नाही, प्रोटोकॉलचा अतिरेक नाही. मोठेपणाचा अंहभाव दाखविला नाही. कोल्हापुरात दाखल झाल्यापासून त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य कधी मावळले नाही.
प्रत्येकाशी आदरपूर्वक वागत त्यांनी या पदाची गरिमा आणखी उंचावली. एखादा सरन्यायाधीश इतका विनम्र, लोकांत समरस होणारा असू शकतो याचा एक उतकृष्ट वास्तुपाठ ठरू शकतो. कोल्हापुरातील विमानतळावरील स्वागताचा प्रसंग… कोल्हापुरात प्रवेश असो की रविवारी दिवसभर विविध लोकांच्या गाठीभेटी असोत की सांयकाळचा सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा…या साऱ्या प्रसंगात त्यांचा सारा व्यवहार हा ‘आपण सारे एक आहोत…’असाच होता. ‘पद हे अधिकार गाजविण्यासाठी नाही, तर समाजाच्या सेवेसाठी असते’ याची कृतिशील शिकवणच त्यांनी दिली.
राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील स्नेहबंधाला त्यांनी उजाळा दिला. राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी कृतज्ञतेचा भाव त्यांच्या प्रत्येक शब्दांतून उमटला. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राने मनावर घेतल्यास कोणतेही काम अशक्य नाही. विशेष म्हणजे या मंचावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लंडन येथील बाबासाहेबांच्या घराला शासनामार्फत ताब्यात घेतले. या घराला मी दोन वेळा भेट दिली आहे. या घरात शाहू महाराजांचे पत्र आहे, ज्यामध्ये त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण पुढे सुरू ठेवण्यासाठी केलेल्या मदतीचा उल्लेख आहे. शाहू महाराजांच्या मदतीने बाबासाहेब शिक्षण पूर्ण करू शकले. शाहू महाराजांचे हे उपकार आम्हा सर्वांवर आहेत. त्यामुळे या भूमीत काही करता आले, याचा आनंद आहे,‘असे त्यांनी नम्रपणे नमूद केले.
कोल्हापूरकरांचे आभार कसे मानायचे...
भाषणात त्यांनी, खासदार शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, युवराज मालोजीराजे यांचा आवर्जून उल्लेख केला. तसेच सर्किट बेंचच्या उभारणीसाठी योगदान दिलेल्या प्रत्येक घटकाचे स्मरण केले. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालिन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या साऱ्यांनी सहकार्य केल्यामुळेच कोल्हापूरच्या सर्किट बेंचचा शुभारंभ जलदगतीने करता आले हे त्यांनी नमूद केले हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्ये, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या सहकार्याविषयी त्यांनी आभार व्यक्त केले. ‘सर्किट बेंच शुभारंभाच्या निमित्ताने कोल्हापूरात आलो. कोल्हापूरकरांकडून दोन दिवसांत मिळालेल्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. कोल्हापूरकरांचे हे आभार कसे मानायचे ? ’ हे त्यांचे बोल उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेले.
...................
सरन्यायाधीश पद नियुक्तीएवढाच आजचा क्षण आनंददायी
शाहू महाराजांच्या कर्तृ़त्वाच्या भूमीत त्यांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारशाला न्याय देण्याचे काम या माध्यमातून होत आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील शेकडो वकील आणि विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच न्यायमूर्ती उपस्थित आहेत. सरन्यायाधीश पदावर नियुक्ती झालेल्या दिवसाप्रमाणे आजचे क्षण आनंददायी आहेत.’असे त्यांनी सांगितले. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील व माजी राज्यपाल रा. सु. गवई यांच्यातील मैत्रभाव उलगडताना त्यांनी आमदार सतेज पाटील यांचा नामोल्लेख केला. माझ्या स्वागतासाठी आमदार पाटील यांनी रस्त्यावर उभे राहत फुलांचा वर्षाव केला. हे सारे प्रसंग अविस्मरणीय आहेत.’अशा भावना व्यक्त केल्या. कधी धीरगंभीर स्वरात, कधी नर्मविनोदी शैलीत तर कधी प्रशासकाच्या भूमिकेतून त्यांनी उपस्थितांशी जवळपास तासभर मुक्त संवाद साधला. ‘कोल्हापूरच्या सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रुपांतर होईल. मी, कोल्हापूरला सर्किट बेंचला बेंच म्हणत नाही. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये यांनी कायमस्वरुपी बेंचसाठी प्रस्ताव पाठवावा. मी अजून साडेतीन महिने या पदावर आहे. हा कालावधी काही माझ्यासाठी कमी नाही.’अशा शब्दांत त्यांनी खंडपीठासंबंधी सहा जिल्ह्यातील नागरिकांना आश्वस्त करत पुन्हा एकदा उपस्थितांची मने जिंकली. त्याचवेळी त्यांनी वकिलांना, सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासंबंधीची जाणीव करुन दिली.