पूरग्रस्तासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ५१ लाख रुपयांच्या किंमतीचे साहित्य पाठविणार
schedule25 Sep 25 person by visibility 127 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील पूरग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, कोल्हापूर जिल्ह्यातर्फे ५१ लाख रुपयांच्या किंमतीचे साहित्य पाठविण्यात येणार आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तू, कपडे, चारा अशा वस्तूंचा समावेश असेल. पहिल्या टप्प्यात ५२ लाख रुपये किंमतीच्या वस्तू तत्काळ रवाना होतील असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट सांगितले.
सोलापूर, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीडसह अन्य जिल्ह्यात गेल्या काही दिवसात पावसाने हाहाकार उडविला आहे. शेतपीके वाहून गेली आहेत. घरांची नासधूस झाली आहे. या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मार्केट यार्ड येथील पक्ष कार्यालयात आढावा बैठक झाली.
याप्रसंगी मंत्री मुश्रीफ यांनी, ‘कोल्हापूर जिल्ह्यावर ज्या ज्या वेळी संकटे उद्भवली, त्यावेळी इतर जिल्हयातील नागरिकांनी मदतीचा हात दिला आहे. आता ज्या जिल्ह्यात पावसामुळे दैना उडाली आहे, त्यांना मदत करण्याची जबाबदारी कोल्हापूरकरांची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ५१ लाख रुपयांच्या किंमतीचे साहित्य दिले जाईल. यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे. पूरग्रस्त भागात जिथे जास्त आवश्यकता आहे, त्या ठिकाणी साहित्य रवाना होईल. संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून मदत वाटपाचे नियोजन होईल.’
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांनी भाषणात पूरग्रस्तांना मदत करण्यात कोल्हापूर जिल्हा कुठे कमी पडणार नाही. जास्तीत जास्त मदत पोहोचवू. सगळयांनी कर्तव्यभावनेने सहभागी व्हावे असे नमूद केले. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी गोकुळचे संचालक प्रा. किसन चौगले, रणजितसिंह पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रणवीरसिंह गायकवाड, राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमरसिंह माने, विनय पाटील, बाजार समितीचे सभापती सुर्यकांत पाटील, संचालक भारत पाटील-भुयेकर, माजी नगरसेवक संभाजी देवणे, महेश सावंत, परिक्षीत पन्हाळकर, प्रकाश कुंभार, सतीश लोळगे, शंकरराव पाटील, मधुकर जांभळे, शिरिष देसाई, बाबासाहेब देशमुख, सुहास जांभळे, प्रवीण काळबर, प्रविण भोसले, अमित गाताडे, महेंद्र चव्हाण, नितीन दिंडे, संजय चितारी, आसिफ फरास आदी उपस्थित होते.