पूरग्रस्तांसाठी आमदार अमल महाडिकांचा मदतीचा हात ! स्वखर्चातून दिले १५०० कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य !!
schedule26 Sep 25 person by visibility 108 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक यांनी स्वखर्चातून सोलापूर जिल्ह्यातील १५०० पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्याचा निर्णय घेतला.एका कुटुंबाला १५ दिवस पुरेल इतके धान्य, डाळी, तेल, साबण, टूथपेस्ट, ब्लँकेट अशा जीवनावश्यक वस्तूंचे किट बनविले आहेत.
नागाळा पार्क येथील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात खासदार धनंजय महाडिक, आमदार महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे साहित्य ट्रकमधून सोलापूरकडे रवाना करण्यात आले. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव उपस्थित होते. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक यांनी, आमदार अमल महाडिक यांनी राबवलेला उपक्रम अनुकरणीय आहे असे मत व्यक्त केले. कोल्हापूरवर जेव्हा महापुराचे संकट ओढवले तेव्हा महाराष्ट्रभरातून मदत येत होती. आता कोल्हापूरकरांनीही मराठवाड्याच्या मदतीला धावून जात माणुसकीचे दर्शन घडवले आहे. आमदार महाडिक यांची मदत ही चांगली सुरुवात असून जिल्हाभरातून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मदत गोळा करून पूरग्रस्त भागात पाठवतील अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली.
आमदार अ महाडिक यांनी, ‘ लोकप्रतिनिधी आणि जागरूक नागरिक म्हणून म्हणून संकटकाळी लोकांना साथ देणे हे माझे कर्तव्य आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. ही मदत त्या पूरग्रस्त बांधवांच्या मोडून पडलेल्या संसाराला उभारण्यासाठी खारीचा वाटा ठरेल. कोल्हापुरातील दातृत्वशील व्यक्ती आणि संस्थांनीही पूरग्रस्तांसाठी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी तानाजी पाटील, संतोष पाटील, प्रमोद पाटील, सचिन पाटील, मकरंद बोराडे, आझम जमादार, उमेश पाटील, प्रितेश दोशी उपस्थित होते.