आठ महिने उलटले, सिनेट सभा नाही ! नियमांचे उल्लंघन प्रशासनाची चालढकल ! !
schedule21 Nov 25 person by visibility 4 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वर्षातून दोन वेळेला सिनेट सभा घेणे बंधनकारक असताना शिवाजी विद्यापीठाची सभा आठ महिने उलटले तरी झाली नाही. सार्वजनिक विद्यापीठाच्या एकरूप परिनियम क्रमांक ०४ मधील कलम ३(१) नुसार अधिसभेच्या अर्थात सिनेटच्या वर्षातून दोन बैठका होणे बंधनकारक आहे. तसेच दोन बैठकांमधील अंतर आठ महिन्यांपेक्षा अधिक असता कामा नये, अशी तरतूद आहे. या नियमावलींचे उल्लंघन झाले आहे. मात्र प्रशासनाची सिनेट सभेसंदर्भात चालढकल सुरू असल्याचे सिनेट सदस्य अभिषेक मिठारी यांनी म्हटले आहे.
विद्यापीठाची यापूर्वीची अधिसभा १५ मार्च २०२५ रोजी झाली होती. आठ महिन्याहून अधिक कालावधी लोटून देखील सिनेटच्या बैठकी संदर्भात कोणतीही सूचना अद्याप प्राप्त नाही. हा गंभीर प्रकार पहिल्यांदाच शिवाजी विद्यापीठामध्ये घडला असून गेल्या काही दिवसांत ‘विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणाऱ्या’ घटना अनेकदा घडत आहेत. या गोष्टींचा अधिसभा सदस्य म्हणून अत्यंत खेद व विषण्णता वाटत आहे असे मिठारी यांनी म्हटले आहे. उच्चशिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब असून शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून अक्षम्य अशी चूक घडलेली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या दैदिप्यमान इतिहासाला गालबोट लागत आहे. प्रशासनाच्या या चुकीचा निषेध नोंदवित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रशासनाचा हा कारभार म्हणजे अधिसभेचा म्हणजेच पर्यायाने समाजाचा घोर अवमान आहे. याचा मी अत्यंत तीव्र शब्दात अधिसभा सदस्य म्हणून निषेध नोंदवीत आहे.