वारसा हा दगड विटांचा समूह नसून अस्मितेचे प्रतीक - नंदिता घाटगे
schedule20 Nov 25 person by visibility 19 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोणत्याही वास्तूचा वारसा म्हणजे केवळ दगड-विटांचा समूह नसून तो आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि अस्मितेचे प्रतीक आहे. तरुण वास्तुविशारद संवेदनशीलतेने पुढे आले तर वारसा संवर्धनाचे कार्य अधिक भक्कम होईल, असे प्रतिपादन इंटिरियर डिझायनर नंदिता घाटगे यांनी केले.
विश्व वारसा सप्ताह २०२५ निमित्त डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्कीटेक्चरच्या वतीने आयोजित ‘अवेरनेस टू अक्शन – प्रिझर्व्हिंग अवर हेरीटेज’ या विशेष सेमिनारमध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.घाटगे म्हणाल्या, आजच्या युगात व्यावसायिक विकास आणि वारसा संवर्धन यामध्ये समतोल साधणे ही काळाची गरज आहे. वारसा जतन करणे व संवर्धन हि प्रत्येकाची जबाबदारी आहे. आवश्यक तेथे तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे. कोल्हापूरसारख्या ऐतिहासिक शहरात वारसा जतनासाठी युवकांचा सक्रिय सहभाग वाढत आहे ही समाधानाची बाब आहे.
वास्तुविशारद अमरजा निंबाळकर यांनी भारतीय आणि महाराष्ट्रातील समृद्ध वास्तू-वारसा, सांस्कृतिक ओळख आणि वारसा जतन याबाबत मार्गदर्शन केले. वारसा वास्तूंमध्ये शाश्वत नियोजन, तांत्रिक मोजमाप आणि पुनर्वापर यांचे महत्त्व त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून दिले.
स्कूल ऑफ आर्कीटेक्चरच्या प्रमुख आर्किटेक्ट इंद्रजीत जाधव म्हणाले की, वारसा संरक्षण ही वास्तुविशारदांची व्यावसायिक तसेच सामाजिक जबाबदारी आहे. संस्थेमार्फत वारसा अभ्यास, संशोधन आणि संवर्धनासाठी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले जाईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले. प्रा. गौरी म्हेतर यांनी आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे मार्गदर्शन लाभले.