कृतज्ञतेचा कृतीशील पाठ , शिक्षकांनी जमविला निधी! विद्यार्थ्यांची संकल्पना एक वही-एक पेनची ! !
schedule19 Nov 25 person by visibility 45 categoryशैक्षणिक
शिरोळ तालुका शैक्षणिक मंचचा उपक्रम, सोलापुरातील पूरबाधित शाळांसाठी कोल्हापुरात मदतीचा प्रवाह
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
‘ देणाऱ्याने देत जावे,
घेणाऱ्याने घेत जावे !
घेता घेता एक दिवस,
देणाऱ्याचे हात घ्यावे !!’
कविवर्य विंदा करंदीकर यांच्या काव्यातील या पंक्तीची प्रचिती शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या संवेदनशील कृतीतून येत आहे. तालुक्यातील जिप शाळेतील १५० शिक्षकांनी एकत्र येत निधी जमविला. आणि जमलेल्या त्या निधीचा विनियोग सोलापूर आणि माढा भागातील महापुरांनी बाधित शाळांच्या मदतीसाठी केला. महापुरांनी बाधित शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले. कौतुकास्पद बाब म्हणजे शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांना सोलापूर जिल्ह्यातील पूरबाधित विद्यार्थ्यासाठी ‘एक वही- एक पेन’ देत मदत कार्यात खारीचा वाटा उचलला.
कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली की शिरोळ तालुक्यात हमखास पूरस्थिती निर्माण होते. कधी कधी महापुराचा विळखा अख्ख्या तालुक्याला पडतो. २०१९ मध्ये महापुराने शिरोळ तालुक्यात प्रचंड नुकसान झाले. महापुराच्या तडाख्यातून शाळा ही सुटल्या नाहीत. पुराने बाधित शाळांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील विविध भागातून मदतीचा ओघ शिरोळमध्ये आला. ते ऋण न विसरण्यासारखे. त्या ऋणाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुराने बाधित झालेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी मदतनिधी उभारण्याचा संकल्प शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी केला.
तालुक्यातील जिप शाळेतील शिक्षकांनी एकत्र येऊन शिरोळ तालुका शैक्षणिक मंचची स्थापना केली आहे. या मंचच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यासाठी स्पर्धा परीक्षा, शिक्षकांसाठी कार्यक्रम होतात. यंदा, या शिक्षक परिवाराकडून सोलापूर जिल्ह्यातील शाळासाठी मदतनिधी उभारण्याचा संकल्प केला होता. प्रत्येकाला मदत करण्याविषयी आवाहन केले. १५० हून शिक्षकांनी आर्थिक स्वरुपात मदत केली. शिक्षक परिवाराच्या मदतीतून एक लाख २५ हजार रुपयांचा निधी जमा झाला.
त्या निधीतून पुराने बाधित झालेल्या शाळांसाठी पोर्टेबल साउंड सिस्टीम (माईकसह), अवांतर वाचनाची पुस्तके आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य संच ( पाण्याची बाटली, वह्या,पेन,पेन्सिल व स्कुलबॅग) खरेदी केल्या. सोमवारी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी हे सर्व मदत साहित्य सोलापूर जिल्ह्यातील वाकाव,मुंगशी व नाडी आणि धाराशिव जिल्ह्यातील नालगाव,वडणेर व देऊळगाव या गावातील आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांना पोहोच केले आहे.या उपक्रमासाठी शिरोळ तालुक्याचे गटविकास अधिकारी नारायण घोलप व गटशिक्षणाधिकारी भारती कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमाविषयी सांगताना शिक्षक सुनील एडके म्हणाले, ‘शिरोळ तालुका शैक्षणिक मंचमध्ये तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा सहभाग आहे. विशेष म्हणजे, या मंचमध्ये कोणी अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सचिव नाहीत. सगळे एकसमान. शिवाय हा मंच संघटना विरहित आहे. शिक्षक म्हणून सगळेजण एकत्र आहेत. २०१९ च्या महापुरात शिरोळ तालुक्यातील शाळांना राज्यभरातून मदत मिळाली. त्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तालुक्यातील शिक्षकांनी एकत्र येत, निधी जमविला. आणि छोट्या स्वरुपात सोलापूर जिल्ह्यातील पुरांनी बाधित शाळांना मदत केली.’
………………
विद्यार्थ्यांच्या मदतीतून २०० डझन वह्या संकलित
शिक्षकांनी निधी जमविला. शिरोळ तालुक्यातील विद्यार्थ्याच्या मदतीतून सोलापूर जिल्ह्यातील पूरबाधित शाळेतील विद्यार्थ्यासाठी २०० डझन वह्या व पेन संकलित झाल्या. शिरोळ तालुक्यातील शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने मदत म्हणून एक वही व एक पेन द्यावे असे आवाहन शैक्षणिक मंचने केले होते. त्या आवाहनला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी वह्या व पेन सुपूर्द केल्या.