ज्येष्ठांच्या हक्कासाठी मंगळवारी कोल्हापुरात सन्मानवारी
schedule20 Nov 25 person by visibility 20 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अर्थक्रांती जीवन गौरव अभियान अंतर्गत कोल्हापुरात मंगळवारी, २५ नोव्हेंबर २०२५ रोजी ज्येष्ठांची हक्काची सन्मानवारी काढण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सात हजार रुपये मानधन मिळावे या प्रमुख मागणीसाठी ही सन्मानवारी असल्याचे प्रमुख मार्गदर्शक महादेव यादव महाराज, मुख्य समन्वयक जगन्नाथ मोरे पाटींल व ज्येष्ठ सल्लागार पी. के. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवाजी पेठेतील वरुणतीर्थ वेस ते करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर अशी सन्मानवारी निघेल. सकाळी अकरा वाजता वरुणतीर्थ वेसन येथून सन्मानवारीला सुरुवात होईल. पांढरा शर्ट पायजमा, डोक्यावर गांधी टोपी व हातात बोर्ड घेऊन ज्येष्ठ नागरिक यामध्ये सहभागी होणार आहेत. ‘आमच्या कष्टाला मान द्या, आमच्या जगण्याला आधार द्या, सन्मानधन तातडीने द्या’या आशयाची पन्नास हजार पत्रके करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या चरणी ठेवण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानधनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या अनोख्या वारीचे आयोजन केले असल्याचे संयोजकांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस पुणे प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष गुरुलिंग कन्नूरकर, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आनंदराव वायदंडे, बाबूराव कोळेकर, हनुमंत शेवाळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा राणी गायकवाड, संतोष पांचाळ, नाना सावंत, अशोक पाटील दोनवडेकर, भारती आडूरकर आदी उपस्थित होते.