मेन राजारामच्या विजयी खेळाडूंची वाजतगाजत मिरवणूक ! स्वागताला अधिकारी !!
schedule20 Nov 25 person by visibility 14 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वाद्यांचा गजर, टाळयांचा कडकडाट, रस्त्याच्या दुतर्फा अभिनंदनासाठी उभारलेले विद्यार्थी सहकारी आणि स्वागताला अधिकारी…अशा वातावरणात मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या राज्यस्तरीय १९ वर्षाखालील मुलींच्या खो-खो संघातील खेळाडूंची मिरवणूक निघाली. मिरवणुकीनंतर आयोजित सत्कार सोहळयात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी विजेत्या खेळाडूंचे कौतुक कले.
‘जीवनातील कोणतेही यश लगेच प्राप्त होत नाही. कष्ट, त्याग, प्रेरणा व समर्पण या चतुसूत्रीच्या जोरावरच जीवनात यशस्वी होता येते. कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्या बरोबर त्याग व समर्पणातूनच सर्वोच्च शिखरावर पोहोचता येते’अशा शब्दांत सीईओ कार्तिकेयन एस यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेजने शालेय राज्यस्तरीय १९ वर्षाखालील मुलींच्या खो-खो स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल गुणवंत खेळाडूंचा गुरुवारी सत्कार समारंभ आयोजित केला होता. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर, प्राचार्य डॉ. जी. व्ही. खाडे उपप्राचार्या श्रीमती व्ही. ए. खडके, प्रशिक्षक बी. आर. भांदिगिरे, क्रीडा शिक्षक प्रा. बी. पी. माळवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. सुवर्णपदक प्राप्त सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन यथोचित गौरव करण्यात आला.
प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी, जीवनात सर्व काही विकत मिळते. परंतु जिद्द, त्याग, समर्पण सातत्य व दुर्दम्य इच्छाशक्ती शक्ती विकत मिळत नाही. ती आपल्या अंतरंगात असावी लागते. या सर्व गोष्टी आपल्याकडे असतील तर जीवनात कोणीही आपल्याला हरवू शकत नाही. असे सांगितले. प्राचार्य डॉ जी.व्ही. खाडे यांनी प्रास्ताविक केले. राज्यस्तरीय व विभागीय स्पर्धेसाठी खासदार शाहू महाराज व जिल्हा प्रशासन, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, मनापा प्रशासन अधिकारी, पालक, प्रशिक्षक यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख यावेळी केला. क्रीडा शिक्षक बी. पी. माळवे, कर्णधार अमृता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. सुषमा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तत्पूर्वी विजेत्या खेळाडूंना फेटा बांधून उघडया जीपमधून कोल्हापुरातील प्रमुख मार्गावरुन वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.