महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी शेंडा पार्कात जागा मंजूर, पाच एकर जागा उपलब्ध
schedule20 Nov 25 person by visibility 78 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसाठी शेंडा पार्क येथे पाच एकर जागा मंजूर झाली आहे. महापालिका इमारतीसाठी पाच एकर जागा उपलब्ध केल्यासंबंधीचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिका प्रशासनास मिळाले आहे. महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी यासंबंधीची माहिती दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ उपस्थित होते.
महापालिका प्रशासनाने, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शेंडा पार्क येथे इमारत बांधण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याविषयी प्रस्ताव सादर केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मंजुरीनंतर पाच एकर जागा महापालिकेच्या नावे करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महापालिकेने चार एकर जागेची मागणी केली होती. दरम्यान पाच एकर जागा मिळाली आहे. या जागेवर महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत बांधणी प्रस्तावित आहे. इमारत बांधणीचे काम दोन टप्प्यात होणार आहे. महापालिकेने यापूर्वी निर्माण चौक येथील मैलखड्डा येथे मुख्य प्रशासकीय इमारत बांधण्यासाठीचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला होता. त्यावेळी नवीन इमारत बांधकामासाठी १४३ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता.
आता शेंडा पार्क येथे जागा उपलब्ध झाल्याने महापालिका प्रशासनाकडून नव्याने आराखडा तयार केले जाणार आहे. नवीन इमारतीचे काम दोन टप्प्यात करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे.सध्या महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत ही कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत आहे. सध्याची इमारत १९२९ मधील आहे. या इमाारतीचे विस्तारीकरण १९५५ मध्ये झाले. पूर्वी ही इमारत महात्मा गांधी मार्केट म्हणून ओळखली जायची. या इमारतीमध्ये नगरपालिकेचे कामकाज झाले. १९७२ मध्ये महापालिकेची स्थापान झाल्यानंतर प्रशासकीय कामकाज या इमारतीतून सुरू झाले. सध्या ही इमारत प्रशासकीय कामकाजासाठी अपुरी पडत आहे. विविध ऑफिसेस अन्य ठिकाणी सुरू आहेत. शिवाय वाहनतळासाठी पुरेशी जागा नाही. शहराच्या मध्वस्तीत असल्यामुळे पार्किंगची समस्या आहे. भविष्यकाळाचा विचार करुन शेंडा पार्क येथे जागा मिळावी असा प्रस्ताव महापालिकेने सादर केला होता.