कागलमध्ये राजकीय घमासान, मंडलिक-मुश्रीफांत हल्लाबोल
schedule21 Nov 25 person by visibility 26 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कागल नगरपालिकेच्या निवडणुकीतून शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक आणि राष्ट्रवादीचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये आरोप,प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. एकमेकांवर बोचरी टीकेचे बाण सुटल्याने कागलमध्ये राजकीय घमासान पाहावयास मिळत आहे.
मंत्री मुश्रीफ व शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्या युतीवर हल्लाबोल करताना माजी खासदार मंडलिक म्हणाले, ‘एका नेत्याला गैबी चौकातील वाडयावरील आरक्षणचा प्रश्न मार्गी लावायचा आहे. तर दुसऱ्या नेत्याला ईडीच्या चौकशीतून सुटका मिळवायची आहे. म्हणून कागलमधील हे कट्टर राजकीय विरोधक एकवटले आहेत. त्यांच्या युतीमध्ये जनतेच्या हिताचा, कागलच्या विकासाचा विषय नाही. वैयक्तिक फायद्यांसाठी ते एकत्र आले आहेत. मुश्रीफ व समरजितसिंह घाटगे युतीमुळे मंडलिक गट एकाकी पडल्याची चर्चा होत असली तरी, यानिमित्ताने आमच्या गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नव्याने ताकत निर्माण झाली आहे. २००९ मधील लोकसभा निवडणुकीत दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यावेळीही मंडलिक एकटे पडले अशी चर्चा झाली. मात्र जनतेने कौल दिला, सदाशिवराव मंडलिक विजयी झाले. कागलमध्ये तोच इतिहास पुन्हा घडेल.’
मंडलिक यांच्या टीकेला मंत्री मुश्रीफ यांनी जोरदार उत्तर दिले आहे. मुश्रीफ म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने समरजितसिंह घाटगे व माझी युती झाली आहे. आम्ही एकत्र येण्यामागे कागलचा विकास हा अजेंडा आहे. मात्र प्रा. संजय मंडलिक यांनी आमच्यावर टीका करताना सांभाळून बोलावे. आपले तोंड आवरावे. संजय मंडलिक यांनी लोकनेते व दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्याशी तुलना करुन घेऊ नये. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांचे काम मोठे आहे. ते कुठे आणि प्रा. संजय मंडलिक कुठे ? मी, जर संजय मंडलिक यांच्याविषयी बोलायला लागलो तर बात दूर तक जायगी ! ईडीतून माझी कोर्टातून मुक्तता झाली आहे. तेव्हा मंडलिक यांच्या आरोपात काही तथ्य नाही. शिवाय जमीनीवरील आरक्षण उठविण्यासाठी समरजितसिंह घाटगे यांनी आमच्यासोबत युती केली हा आरोपही निराधार आहे.’