अजित ठाणेकरही विधानसभा लढविण्याच्या तयारीत, पक्षाकडे मागितली उमेदवारी
schedule04 Oct 24 person by visibility 308 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी आगामी विधानसभा लढविण्याच्या तयारीत आहेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षातर्फे मला निवडणूक लढवण्यास संधी मिळावी. याबाबतचे पत्र मी पक्ष श्रेष्ठींना दिले असल्याचे सांगितले. कोल्हापूर उत्तरमधून ते इच्छुक आहेत.
ठाणेकर म्हणाले, ‘मी १९८९ पासून सामाजिक कार्यात आहे. प्रथमत: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि २००० पासून भारतीय जनता पार्टी मध्ये मी सक्रिय आहे. तिन्ही संघटनांमध्ये शहर स्तरावरील विविध जबाबदार्या पार पडल्या आहेत. २०१५ मधील महानगरपालिका निवडणुकीत पक्षाने मला योग्य समजल्यामुळे नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. महानगरपालिकेत एक वर्ष स्थायी समिती सदस्य, एक वर्ष शिक्षण मंडळ सदस्य आणि एक वर्ष आघाडीचा गटनेता म्हणून काम करण्याची संधीही मला पक्षाने दिली आणि मी त्यातून अनेक नागरी समस्या सोडविण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
समिधा प्रतिष्ठान या सेवा संस्थेच्या माध्यमातून मी गेली सुमारे वीस वर्षे विविध सामाजिक कामेही करतो आहे. तसेच श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपुजक मंडळाच्या सहकार्याने गेली बारा वर्षे मी शहरातील हजारो गरजू विद्यार्थ्यांना पूर्ण भरलेल्या दप्तरांचे वाटप करतो आहे. गेल्या वर्षातील केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा गरजूंना फायदा व्हावा यासाठी माझ्या कार्यालयातून त्यांना सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. माझी शैक्षणिक पात्रता, माझा संघटनात्मक अनुभव, कोल्हापूरच्या आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या बहुतांश समस्यांबाबत असलेला अभ्यास, महानगरपालिकेतील पदाधिकारी आणि अधिकार्यांची उघडकीस आणलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे, लोकप्रतिनिधी म्हणून पाच वर्षाच्या काळात केलेले निष्कलंक काम आणि समाजातील अनेक स्तरातून, अनेक नामांकित प्रतिष्ठित लोकांचा आग्रह यामुळे विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी मिळावी असे त्यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेवेळी माजी नगरसेवक विजय खाडे, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे आदी उपस्थित होते.