राजेश क्षीरसागरांच्या अजेंडयावर शहरासाठी टॉपची वीस विकासकामे ! दोन वर्षानंतर मंत्रीपदही मिळणार !!
schedule21 Dec 24 person by visibility 299 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे तिसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आगामी काळातील रुपरेषा मांडली. शहर आणि पर्यायाने जिल्हयाच्या विकासाला चालना देणाऱ्या २५ विकासकामांना प्राधान्य राहील हे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच आगामी दोन वर्षानंतर आपणाला मंत्रीपदही मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.दोन वर्षानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होणार हे निश्चित आहे. त्यासंबंधीचे बॉंड ही लिहून घेतले आहेत असेही त्यांनी सांगितले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर कोल्हापुरात दाखल झालेल्या क्षीरसागर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत शहर विकासाच्या विविध कामांचा ऊहापोह केला. तसेच निवडणूक काळात मदत केलेल्या सर्वांचे आभार मानले. महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक या साऱ्यांचा मी आभार असल्याचे त्यांनी नमूद केले.
शहर विकासाच्या योजनाविषयी सांगताना ते म्हणाले, ‘ कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, उच्च न्यायालयाचे खंडपीठ, आय.टी. पार्क, फौंड्री हब, औद्योगिक क्षेत्रांचा विकास, ३२०० कोटींचा पूर नियंत्रण प्रकल्प, पंचगंगा प्रदूषण, झूम प्रकल्प, राजाराम बंधारा नवीन पुलाचे काम, रंकाळा तलावाचे उर्वरित सुशोभिकरण, पर्यटन वाढीच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम, आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, फुटबॉल अॅकॅडमी, शहरातील रिंग रोड, वाहतूक यंत्रणा, पार्किंग, भुयारी मार्ग, महापालिका गाळेधारक प्रश्न, के.एम.टी.कर्मचारी सेवेत कायम करणे आदी बाबत पाठपुरावा करून शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन.”
………………
वरिष्ठांना त्रास देणारा मी कार्यकर्ता नाही…
क्षीरसागर म्हणाले, ‘गेली ३८ वर्षे मी शिवसेनेते आहे. पक्ष नेतृत्वाने सोपविलेल्या सगळया जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे. गेल्या अडीच वर्षाचा विचार करता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोट्यावधीचा निधी शहर व जिल्ह्याच्या विकास कामाना देवून मी माझी कार्यपद्धती सिद्ध केली आहे. मंत्री पद असते तर आणखी जोमाने शहर आणि जिल्ह्याच्या विकासाठी काम करता आले असते. यासह शिवसैनिकांनाही न्याय देण्यास देण्यास यशस्वी झालो असतो. परंतु, यावर आता थोड्याफार प्रमाणात मर्यादा येणार असल्याने मनाला खंत वाटते. मी पदासाठी काम करणारा, वरिष्ठांना त्रास देणारा कार्यकर्ता नाही. दरम्यान दोन वर्षानंतर नक्कीच मंत्रीपद मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून वन नेशन वन इलेक्शन होणार असल्याने मुदतीच्या सहा महिन्यापूर्वीच पुढच्या विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील दोन वर्षांनी आम्हाला मंत्री पद द्यावे, जेणेकरून आमच्या पदास न्याय मिळेल, अशी भूमिका आम्ही वरिष्ठ नेत्यांसमोर मांडणार आहोत. ”