कोल्हापुरात शनिवारी-रविवारी मैत्रीण महोत्सव
schedule20 Dec 24 person by visibility 97 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या मैत्रीण फाऊंडेशनतर्फे २१ व २२ डिसेंबर २०२४ या दोन दिवसाच्या कालावधीत मैत्रीण महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे स्टॉल, खाद्यपदार्थांचे स्टॉल असतील. शिवाय नागरिकांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत. मुंबई येथील ग्रुपचे मराठी-हिंदी गीतांचे सादरीकरण व नृत्याविष्कार हे विशेष आकर्षण असणार आहे. संभाजीनगर येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील मैदानावर महोत्सव होत आहे. या महोत्सवाला एक जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या मु.पो.बोंबिलवाडी सिनेमातील कलाकार भेट देणार आहेत.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवारी महोत्सवाचे उद्घाटन आहे. तर रविवारी होणाऱ्या कार्यक्रमांचे उद्घाटन आमदार राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते होईल. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी माजी महापौर सुनील कदम, सुहास लटोरे, उद्योजक शंकर पाटील, यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे व माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवाला नागरिकांनी उपस्थित राहावे, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटावा, बचत गटाच्या स्टॉलना भेट द्यावी असे आवाहन संयोजक माजी नगरसेवक किरण नकाते, माधुरी नकाते, अमर नकाते यांनी केले आहे. संध्याकाळी सहा ते रात्री दहा अशी महोत्सवाची वेळ आहे.