अजय इंगवले शिवसेनेच्या व्यासपीठावर ! राजेश क्षीरसागरांच्या उपस्थितीत सर्किट हाऊसमध्ये मेळावा !!
schedule28 Sep 25 person by visibility 409 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिका निवडणुकींना अजून तीन-साडेतीन महिन्याचा अवधी असताना आतापासूनच सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. पक्षप्रवेश, आढावा बैठका या माध्यमातून निवडणुकीची रणनिती आखली जात आहे. आगामी महापालिका निवडणूक, मुंबईतील दसरा मेळावा व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ऑक्टोबर महिन्यातील कोल्हापूर दौरा या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा रविवारी (२८ सप्टेंबर २०२५) सर्किट हाऊस येथे मेळावा झाला. दरम्यान या मेळाव्यात शिवसेनेच्या व्यासपीठावर अजय पांडूरंग इंगवले यांची उपस्थिती चर्चेची ठरली. गणेशोत्सव काळात अजय इंगवले यांनी शिवसेनेच्या नेत्यांचे फलक उभारले होते. रविवारी सायंकाळी झालेल्या मेळाव्यात त्यांची व्यासपीठावरील उपस्थिती चर्चेची ठरली. लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे संकेत आहेत.
सर्किट हाऊस येथील मेळाव्यात आमदार क्षीरसागर, शिवसेनेच्या उपनेत्या व माजी आमदार जयश्री जाधव, स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, हर्षल सुर्वे यांची भाषणे झाली.महापालिका निवडणूक महायुती म्हणून ताकतीने लढवायची आहे. महायुतीची सत्ता आणायची आहे. तसेच शिवसेनेचे अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी आतापासूनच तयारी करा असे आवाहन आमदारांनी केले. स्थायी समितीचे माजी सभापती देशमुख यांनी मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे. व्यासपीठावरील व सभागृहात उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी हे भविष्यातील नगरसेवक आहेत. मतदारसंघातील लोकांशी संपर्क साधत सरकारच्या योजना पोहोचवा असे आवाहन केले. मेळाव्याला परिवहन समितीचे माजी सभापती अजित मोरे, राहुल चव्हाण,माजी नगरसेवक आनंदराव खेडकर, रमेश पुरेकर, राजू हुंबे, शिवसेनेचे पदाधिकारी शिवाजी जाधव, रणजित जाधव दुर्गेश लिंग्रस, आदी उपस्थित होते. कमलाकार जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. अंकुश निपाणीकर यांनी सूत्रसंचालन केले.
दरम्यान या मेळाव्यात व्यासपीठावर अजय इंगवले यांची उपस्थिती चर्चेची ठरली. अजय इंगवले हे फिरंगाई तालीम प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी तयारी करत आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान या प्रभागात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांचे वर्चस्व गेल्या काही निवडणुकीत दिसून आले आहे. २०१० मध्ये ते स्वत: निवडून आले होते. तर २०१५ मधील महापालिका निवडणुकीत हा मतदारसंघ सर्वसाधारण महिलासाठी राखीव होता. त्या निवडणुकीत पाच महिला उमेदवार होते. यामध्ये तेजस्विनी रविकिरण इंगवले या २०१५ मते घेत विजयी झाल्या होत्या. तर प्रज्ञा अजय इंगवले यांना १६९७ मते मिळाली होती. रविकिरण इंगवले व अजय इंगवले या दोन्ही चुलत भावंडात राजकीय वैर आहे. दोघेही मतदारसंघात सक्रिय आहे. मतदारसंघात आरक्षण काय पडणार ? ते स्वत: लढणार की कुटुंबांतील सदस्य असणार यावर पुढील राजकारण अवलंबून आहे. निवडणुकीला अजून अवधी असताना एकमेकांना शह-काटशह देण्यासाठी रणनिती आखली जात आहे. अजय इंगवले यांना पक्षात घेऊन फिरंगाई तालीम प्रभागात आव्हान निर्माण करण्याची खेळी शिवसेना आखत असल्याचे दिसत आहे.