मुश्रीफांचा महाडिक, क्षीरसागरांना सल्ला ! वाद होतील अशी वक्तव्ये टाळा, जागा वाटपात राष्ट्रवादीकडे दुर्लक्ष नको !!
schedule25 Sep 25 person by visibility 161 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटपासंबंधी बोलताना खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर यांनी वाद होतील असे वक्तव्ये टाळावीत. कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल असे काही बोलू नये.’ ’असा सल्ला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.
कोल्हापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात ते बोलत होते. महापालिका निवडणुकीच्या जागावाटपावरुन बोलताना भाजपचे खासदार महाडिक यांनी जवळपास पन्नास जागांवर दावा केला आहे. तर शिवसेनेचे आमदार क्षीरसागर यांनी तीस जागा मिळायला हव्यात असे म्हटले आहे.खासदार महाडिक व आमदार क्षीरसागर यांच्या विधानावरुन बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या निवडणुका महायुतीतर्फे होतील का ? हे सांगता येत नाही, पण महापालिका जिंकायची असेल तर महायुती म्हणून लढल्याशिवाय पर्याय नाही. महापालिका निवडणूक अवघड आहे. कारण चार सदस्यांचा एक प्रभाग आहे.
दरम्यान खासदार महाडिक व आमदार क्षीरसागर या दोघांच्या विधानावरुन ते ८० जागांवर दावा करत असल्याचे दिसते. महापालिकेच्या जागा ८१ आहेत. राष्ट्रवादीला फक्त एकच जागा उरते. ‘ महापालिकेसाठी जागा वाटप करताना महायुतीत राष्ट्रवादीकडे दुर्लक्ष होऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गेली वीस वर्षे सत्तेत आहे. पक्षाने अनेक महापौर, उपमहापौर, स्थायी समिती चेअरमन केले. पक्षाकडे शक्तीवान माणसे आहेत. हा पक्ष कासवगतीने चालणारा आहे. ”
…………………..
समन्वय समितीची बैठक
राज्यस्तरावर महायुतीची समन्वय समिती आहे. या समितीत भाजपकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराजे देसाई तर राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व मी त्या समितीत आहे. नुकतीच या समितीची बैठक झाली आहे. जागा वाटप करताना ज्या त्या जिल्ह्याच्या संपर्कमंत्री त्यामध्ये असणार आहे. माझ्याकडे कोल्हापूर, सांगली, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी आहे. जागा वाटपासंबंधी बैठका घेऊन, चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे. परस्पर विधाने करु नयेत.