कोल्हापुरात माणुसकीची जिगर ! मदतीसाठी पुढचं पाऊल !!
schedule26 Sep 25 person by visibility 355 categoryराजकीय

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : जे काही करायचं ते धडाक्यात, हा कोल्हापुरी बाणा. त्याला कुठलेही क्षेत्र वर्ज्य नाही. निवडणुकीच्या काळात टोकाची राजकीय ईर्षा. मतदानादिवशी चुरशीने मतदान. प्रत्येक ठिकाणी ‘हम किसीसे कम नही’ जणू हाच भाव.आनंदाच्या सोहळयात तर उत्साहाला उधाणं. आणि संकटकाळात आधारासाठी कोल्हापूरकरांचं ‘पुढचं पाऊल.’ कोणावर अन्याय झाला, कुठे निसर्गाची अवकृपा झाली, कुठे दुष्काळ पडला आणि कुठे महापुरानं जगणं उघडयावर पाडलं…तिथं कोल्हापूरकर सहकार्यासाठी हमखास सरसावलेले…कोल्हापूरकरांची ही दातृत्वाची भावना, आणि माणुसकीची जिगर पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड या अतिवृष्टी बाधित जिल्हावासियांसाठी, ‘एक हात मदतीचा-पुन्हा नवी उभारी घेण्यासाठी, कोल्हापूरकरांनो संकटग्रस्तांना देऊ या साथ’ अशी साद घालत साहित्य पाठवित आहेत. संकलित करत आहेत.
अनुकरणीय आणि कौतुकास्पद बाब म्हणजे, कोल्हापुरातील नेते मंडळी संवेदनशीलवृत्तीचे दर्शन घडवित सोलापूर आणि मराठवाडयातील नागरिकांनासाठी मदत संकलित करण्यात आघाडीवर आहेत. नेहमी दुष्काळाने होरपळणाऱ्या भागात यंदा पावसाने दैना उडविली. शेतजमीन वाहून गेली. पिके पाण्याखाली बुडाली. काही जणांचे डोक्यावरचं छप्पर हिरावलं. पुराच्या पाण्यात डोळयातील अश्रू आटले. स्वप्नं विरली. डोळयादेखत संसार बुडताना पाहून हवालदिल झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना पुन्हा उभं करण्यासाठी कोल्हापूरकरांनी पुढाकार घेतला. या उपक्रमात विविध संस्था, संघटना आपआपल्या परीने सहकार्य करत आहेत. माणुसकीचा धर्म जागवित आहेत.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी, ‘काँग्रेसची हाक, कोल्हापूरकरांनो मराठवाडयाला साथ देऊ या’अशी समाजमनाला साद घातली. किराणा सामान, प्रथमोपचार साहित्य, पाणी बॉटल्स,नागरिकांसाठी कपडे, रेनकोटस, टॉवेल, शालेय साहित्य, बिस्किट, टूथब्रश अशा विविध प्रकारचे साहित्य जमा करण्याचे आवाहन केले. २४ ते २८सप्टेंबर २०२५ या कालावधीत काँग्रेस कमिटीत साहित्य संकलित केले जात आह. काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह विविध संस्था-संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दोन दिवसात ही मदत ट्रकद्वारे रवाना होणार आहे.
‘एक हात मदतीचा-पुन्हा नवी उभारी घेण्यासाठी’ या विचाराने कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक यांनी १५०० कुटुबीयांना दीड ते दोन महिने पुरेल इतके जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य सोलापूर जिल्हयाकडे पाठविले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हा छोटासा प्रयत्न असल्याचे आमदार महाडिक यांनी म्हटले आहे. त्यांनी स्वखर्चाने हा उपक्रम केला. तर ‘महाडिक परिवार आणि भारतीय जनता पक्षातर्फे रोज एक ट्रक भरुन जीवनावश्यक वस्तू, साहित्य पूरग्रस्त भागात पाच दिवस पाठविण्यात येणार आहे.’असे खासदार महाडिक यांनी म्हटले आहे.
‘संकटग्रस्तांना मदत करु या’ अशा भावनेतून कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातर्फे पूरग्रस्त जिल्ह्यात ५१ लाख रुपये किंमतीचे साहित्य पाठविण्याचे नियोजन आहे. राष्ट्रवादीचे नेते व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वत: या मदत वाटपात लक्ष घातले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे संकलन व गरजूपर्यंत हे साहित्य पोहोच करण्यासाठी त्यांनी एका समितीची स्थापना केली आहे. ५० लाख रुपये किंमतीचे हे साहित्य दोन टप्प्यात पाठविण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा उपक्रमही पूरग्रस्तांना मायेचा ऊब देणारा आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना 3200 लिटर दुधाचे वाटप करण्यात आले गोकुळने नेहमीच सामाजिक उपक्रमांना हातभार लावला आहे.