कोणत्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने अतिक्रमणे वाढली ? महाद्वार रोड, ताराबाई रोड अतिक्रमणमुक्त करा
schedule11 Sep 25 person by visibility 42 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोरोना काळानंतर महाद्वार रोड व ताराबाई रोड येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता दोन्ही रोडवर दिसेल त्या ठिकाणी कॉट टाकून जागा अडविल्या आहेत. महापालिकेने, हो दोन्ही रोड अतिक्रमणमुक्त करावीत असे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांना दिले. प्रशासनातील कोण-कोणत्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत आहेत ? या दोन्ही रोडवर ज्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यांच्याकडे महापालिकेचे परवाने आहेत का ? असा सवाल पदाधिकाऱ्यांनी केला.
येत्या दोन ते तीन दिवसांत या दोन्ही रोडवरील अनधिकृत अतिक्रमणांबाबत महापालिका प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाई झाली नाही तर संपूर्ण महाद्वार व ताराबाई रोडवर असंख्य कॉट टाकून भाजपाच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, जिल्हा सरचिटणीस विराज चिखलीकर, अमर साठे, राजू मोरे, माधुरी नकाते, सुनील पाटील, विजय आगरवाल, विशाल शिराळकर, रविकिरण गवळी, गिरीश साळोखे, अनिल कामत, अजित सूर्यवंशी, कोमल देसाई, एकता भालकर, प्रवीण शिंदे, विश्वजित पोवार, निरंजन घाटगे, राहुल लायकर, अवधूत भाट्ये, अशोक लोहार, तन्मय मेवेकरी, मनोज नलवडे, सयाजी आळवेकर, महेश यादव, अनिल कोळेकर, सचिन घाटगे, संग्राम पाटील यांचा समावेश होता.
अतिरिक्त आयुक्त आडसूळ, इस्टेट अधिकारी व अतिक्रमण विभाग प्रमुख विलास साळोखे यांनी येत्या दोन दिवसात याप्रश्नी ठोस व कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वस्त केले. ताराबाई रोड व महाद्वार रोडला समांतर असणाऱ्या गल्ली बोळांमध्ये फार मोठ्या प्रमाणात पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. सातत्याने या गल्ली बोळांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना या पार्किंगमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. या ठिकाणीच कपिलतीर्थ सारखी कोल्हापुरातील मोठी मंडई असून देखील या हमरस्त्यांवर खुलेआम भाजी विक्री सुरु असते. अनेक व्यवसायिक लोकांनी आपल्या व्यवसायाचे साहित्य आपल्या हद्दीबाहेर जाऊन थेट रस्त्यावर मांडले आहे तसेच दुकानाच्या बाहेर लोखंडी चौकोनी स्टँड पसरले आहेत. त्यामुळे या दोन्ही रोडवर खरेदीसाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना स्वताची वाहने पार्कच करता येत नाहीत हे भाजपच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले.