ना शोध समिती - ना जाहिरात, कुलगुरू निवड प्रक्रिया लांबणीवर ! नवे कुलगुरू लाभणार २०२६ मध्ये ! !
schedule11 Sep 25 person by visibility 152 categoryशैक्षणिक

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के यांच्या कुलगुरुपदाचा पाच वर्षाचा कार्यकाल सहा ऑक्टोबर २०२५ पर्यत आहे. त्यांची मुदत संपायला २६ दिवसाचा कालावधी उरला आहे. मात्र कुलपती कार्यालयाकडून शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया थंडावल्यासारखी स्थिती आहे. कारण कुलगुरू शोधसाठी कुलपती कार्यालयाकडून स्थापण्यात येणारी तीन सदस्यांच्या समितीची अद्याप स्थापना नाही. त्रिसदस्यीय समितीच स्थापन केली नसल्यामुळे नव्या कुलगुरुपदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. त्रिसदस्यीय समितीची स्थापना, जाहिरात प्रसिद्धी, इच्छुक उमेदवारांची अर्ज स्वीकृती, अर्जाची छाननी, मुलाखती, पाच नावे कुलपती कार्यालयाला सादर करणे आणि कुलपती कार्यालयाकडून अंतिमत: कुलगुरुंची घोषणा या साऱ्या प्रक्रियेला साधारणपणे तीन महिन्याहून अधिक कालावधी लागतो.
ही सारी प्रक्रिया आणि उपलब्ध कालावधी पाहता २०२५ मध्ये शिवाजी विद्यापीठाला नवा कुलगुरू निवड अशक्य दिसते. नवीन कुलगुरू, नवीन वर्षात अशी शक्यता शैक्षणिक क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. कुलगुरू शिर्के यांनी सात ऑक्टोबर २०२० यांनी कार्यभार स्विकारला होता. त्यांच्या कुलगुरुपदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ सहा ऑक्टोबर २०२५ रोजी संपत आहे. दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या नवीन कुलगुरु शोध प्रक्रियेचा एक भाग म्हणून कुलपती कार्यालयाने २० मार्च २०२५ रोजी पत्र पाठविले होते. कुलुगुरू शोध समितीवर विद्यापीठाचा एक सदस्य असतो. कुलपती कार्यालयाच्या सुचनेनुसार शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने अधिकार मंडळाच्या मान्यतेने इंदोर येथील आयआयटीचे संचालक सुहास जोशी यांचे नाव निश्चित केले. व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेच्या पाच मे २०२५ रोजी झालेल्या बैठकीत जोशी यांचे निश्चित केले. तसेच कुलपती कार्यालयाला कळविले.
दरम्यान कुलपती कार्यालयाने कुलगुरू शोध प्रक्रियेसाठी मार्च २०२५ मध्ये प्रक्रिया सुरू केल्यामुळे ऑक्टोबर २०२५ मध्येच नवीन कुलगुरू मिळेल असे प्राथमिक चित्र होते. शिवाजी विद्यापीठाने एका सदस्याचे नाव कळवून चार महिन्याचा कालावधी उलटला. कुलपती कार्यालयाकडून अद्याप कुलगुरू शोध समितीची स्थापना झाली नाही. ही समिती त्रिसदस्यीय असते. ही समिती स्थापन झाल्यानंतर कुलगुरुपदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाते. ही जाहिरात राष्ट्रीय स्तरावरील दैनिकात तसेच अखिल भारतीय विद्यापीठ असोसिएशनच्या पाक्षिकात प्रसिद्ध करावी लागते. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर साधारणपणे अर्ज मागविण्याची मुदत महिनाभर असते. अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी प्रक्रिया होते. अर्ज छाननीत वैध ठरलेल्या उमेदवारांची, शोध समिती मुलाखत घेते. इच्छुकांमधून पाच जण अंतिम मुलाखतीसाठी पात्र ठरविले जातात. त्या पाच जणांची नावे कुलपतींना कळविली जातात. कुलपती, त्या पाच जणांपैकी एकाच्या नावाची घोषणा कुलगुरुपदी करतात. काही वेळेला कुलपती, त्या पाच जणांची मुलाखतही घेतात.
ही सारी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तीन महिन्याहून अधिक कालावधी लागतो असे आतापर्यंतच्या निवडीवेळी दिसून आल्याचे शैक्षणिक क्षेत्रातील जाणकार सांगतात. तेव्हा शिवाजी विद्यापीठाच्या नवीन कुलगुरुपदाची प्रक्रिया लांबणीवर पडल्याने यंदा तरी नवीन कुलगुरू मिळण्याची शक्यता कमी आहे. अजूनही शोध समितीची स्थापना व जाहिरात प्रसिद्ध झाल्या नाहीत. यामुळे सहा ऑक्टोबरपर्यंत तरी नव्या कुलगुरुंच निवड होणार नाही इतके निश्चित आहे. नवीन कुलगुरू नवीन वर्षातच मिळेल असे जाणकार म्हणत आहेत. दरम्यान विद्यमान कुलगुरू शिर्के यांचा ऑक्टोबरमध्ये कुलगुरुपदाचा कार्यकाल संपल्यानंतर कुलगुरुपदाचा प्रभारी कार्यभार कोणाकडे ? यासंबंधी वेगवेगळी नावे आतापासूनच चर्चेत आहेत.