कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवास राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा
schedule11 Sep 25 person by visibility 159 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव आता राज्याच्या प्रमुख महोत्सवांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने या महोत्सवाला अधिकृत मान्यता देत राज्य प्रमुख महोत्सवाचा दर्जा दिला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा विशेष पाठपुरावा सुरू होता.
कोल्हापूर शहरास पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. कोल्हापूर जिल्हा ही राजर्षी शाहू छत्रपती यांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे. कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून साजरा केला जात असून म्हैसूरच्या दसरा उत्सवाप्रमाणेच लोकप्रिय होत असलेल्या कोल्हापूरच्या दसरा महोत्सवांतर्गत स्थानिक लोककला, लोकनृत्ये, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, शिवकालीन युद्धकलांचे सादरीकरण सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आयोजित करण्यात येतात . जेणेकरून या कलांना व कलाकारांना प्रोत्साहन मिळावे व भावी पिढीला या कलांची माहिती व्हावी. कोल्हापूरमध्ये साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ म्हणजेच श्री अंबाबाईचे मंदीर आहे. शारदीय नवरात्र उत्सवामध्ये श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी तीस लाखाहून अधिक पर्यटक राज्यातील तसेच देशातील विविध भागांमधून या ठिकाणी येत असतात.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नुकताच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झालेल्या मराठा लष्करी भूप्रदेश या शृखंलेतील किल्ले पन्हाळगड तसेच श्री क्षेत्र जोतिबा मंदिर, गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य, कणेरीमठ, आंबा घाट, खिद्रापूर येथील स्थापत्य कलेसाठी जगप्रसिद्ध कोपेश्वर मंदीर इत्यादी पर्यटनाच्या दृष्टीने अनेक प्रेक्षणीय स्थळे उपलब्ध आहेत. तसेच पर्यटकांना राहण्यासाठी मुबलक प्रमाणात हॉटेल्स, लॉजिंग, धर्मशाळाही उपलब्ध आहेत. त्यामुळे दसरा महोत्सवास राज्याचा मुख्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे पर्यटक कोल्हापूर मध्ये किमान दोन दिवस मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी पन्हाळा किल्ला, नृसिंहवाडी इत्यादी स्थळांना भेट देऊन पर्यटनाचा आनंद घेऊ शकतील.
कोल्हापूरच्या स्थानिक रोजगारमध्ये वाढ होण्यास तसेच विकासदर वाढीस मदत मिळू शकेल. जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी कोल्हापूर शाही दसरा महोत्सवास राज्य प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळण्याबाबत प्रस्ताव सरकारकडे सादर करून मंत्रालयीन स्तरावर विशेष पाठपुरावा केला, त्यामुळेच कोल्हापूर शाही दसरा महोत्सवाचा पर्यटन विभागामार्फत यंदाच्या वित्तीय वर्षातील आयोजित केले जाणाऱ्या महोत्सवाच्या दिनदर्शिकेमध्ये प्रमुख पर्यटन महोत्सव ( २०२५-२६) या यादीत समावेश झाला आहे. अकरा सप्टेंबर रोजी सांस्कृतिक विभागाकडील परिपत्रकात कोल्हापूरचा दसरा महोत्सव हा ' राज्य महोत्सव ' म्हणून समावेशित करण्यात आला .