ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची, दूर ती गेली तरीही सावली भेटायची !
schedule24 Dec 24 person by visibility 183 categoryशैक्षणिक
विवेकानंदच्या प्रांगणात अरुण म्हात्रेंनी फुलविला कवितांचा मळा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
‘ ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची
दूर ती गेली तरीही सावली भेटायची !’ अशा शब्दांत मानवी भावभावना गुंफत, काव्यातून प्रेमाचा विविधांगी आविष्कार फुलवित कवी अरुण म्हात्रे यांनी श्री स्वामली विवेकानंद शिक्षण संस्थेच्या प्रांगणात मंगळवारी सकाळी कवितांचा मळा फुलविला. कधी संवादातून तर कधी कवितेून गावाकडची सैर घडविताना बदलत्या समाजाचे दृष्य उलगडत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनी ’उंच माझा झोका…’ही प्रवाहित केला.
निमित्त होतं, येथील विवेकानंद कॉलेजमधील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे गुणवत्ता शिष्यवृत्ती वितरण समारंभाचे. संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. कॉलेजचे प्राचार्य आर. आर. कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कवी म्हात्रे यांनी सहजसोप्या भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘विवेकानंद शिक्षण संस्थेने सामान्य माणसाच्या लिहित्या हातांना बळ दिले आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक कार्याचा चढता आलेख महाराष्ट्राला ज्ञात आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे काव्यमय चरित्र लिहिणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. शिवाय विद्यार्थ्यांनी मातीशी नाळ जोडून आपली संस्कृती जोपासली पाहिजे. स्वतंत्र शिष्यवृती देणारे विवेकानंद कॉलेज हे महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय आहे. गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौध्दिक क्षमतेला प्रेरणा मिळत राहते. ’असे प्रारंभीच त्यांनी नमूद केले.
‘ज्यांच्या घरात पुस्तकांचे कपाट आहे ते सर्वात श्रीमंत घर असते,’असे सांगत कवितांच्या प्रांताची सफर सुरू केली. मंगेश पाडगावकर, फ. मुं. शिंदे, सुरेश भट, नारायण सुर्वे, प्रदीप निफाडकर, विठ्ठल वाघ, महेश केळूसकर यांच्या कवितांसह स्वत:च्या कविता आणि गीते सादर केली. कवी म्हात्रे यांनी त्यांच्या लोकप्रिय कविता ऐकविल्या.
“ फाटके होते खिसे अन् नोटही नव्हती खरी
पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची !’ या त्यांच्या पंक्ती दाद घेऊन गेल्या. कविता, गाणी, मालिकेतील गाजलेली गाणी सादर करत त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गाव सोडतानाची मनस्थिती, बदलते खेडे, शहरीकरण, मानवी समूहावर होणाऱ्या परिणामांची मांडणी करत विद्यार्थ्यांना सध्यस्थितीची जाणीव करुन दिली. ‘उंच माझा झोका’मालिकेतील…
‘असे आगळे हे नाते ऐक ही रमा सांगते
बीज हे रुजे अंतरी, जगण्याचे फूल होते
अशा संसार गाण्याला त्याचा माझा एक ठेका
त्याच्या कृतार्थ डोळयांत झुले उंच माझा झोका ! ’यांनी व्याख्यानाची सांगता केली.
विद्यार्थी प्रतिनिधी शुभम पाटील व अनिकेत पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत मांडले तसेच कॉलेजचे माजी विद्यार्थी प्रा. बबलू वडर यांनी कविता सादर केली. प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संदीप पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. परीक्षा नियंत्रक डॉ. जी. जे. नवाथे यांनी आभार मानले. प्रा.समीक्षा फराकटे व प्रा.सुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रा. एस. पी. थोरात, आयक्युएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी, समारंभाचे समन्वयक डॉ. कैलास पाटील, प्रा. शिल्पा भोसले, प्रा. एम. आर.नवले, डॉ. ए. बी. वसेकर, डॉ. बी. टी. दांगट, प्रा. विश्वंभर कुलकर्णी, प्रा. किशोर गुजर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार आर. बी.जोग, उपस्थित होते.
…………………………………………………………
“विवेकानंद कॉलेजने कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात अनेक नामवंत विद्यार्थी देशसेवेसाठी दिले आहेत. ज्या मातीत आपण जन्माला आलो त्या मातीसाठी आपण काही देणे लागतो, याचा विसर विद्यार्थ्यांनी पडू देऊ नये. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांची धुरा संस्था कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी सांभाळली आहे. प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे एक विश्वविद्यालय आहेत, त्यांच्या शाळेतच माझ्यासारख्या कित्येकांची जडणघडण झाली आहे. बापूजींचा हा वैचारिक वारसा पुढील पिढीने जोपासावा व देशभर पसरावा.”
- कौस्तुभ गावडे, सीईओ विवेकानंद शिक्षण संस्था