अमृत योजनेतील कामांची अमल महाडिकांकडून पाहणी, पाण्याच्या दहा टाक्क्या पंधरा दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना
schedule24 Dec 24 person by visibility 40 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
आमदार अमल महाडिक यांनी अमृत एक योजनेअंतर्गत शहरात विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाक्यांना भेट देऊन पाहणी केली. शहरवासियांना वारंवार पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी या टाक्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत अशा सूचना महापालिकेच्या जल अभियंता आणि अधिकाऱ्यांना दिल्या.
या टाक्यांपैकी दहा टाक्यांची कामे दहा जानेवारी पर्यंत पूर्णत्वाला न्यावीत अशी सूचना महाडिक यांनी केली. उर्वरित टाक्यांची कामे जानेवारीअखेरपर्यंत पूर्ण करावीत असे आदेश महाडिक यांनी दिले. शहरातील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी जलवाहिन्यांची कामे लवकर मार्गी लावावीत. पंपिंग स्टेशनमध्ये होणारा विजेचा खर्च कमी करण्यासाठी पाणी उपसा केंद्रांवर सोलर पॅनल बसवण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, शासन स्तरावर निधीसाठी पाठपुरावा करू असे आश्वासन महाडिक यांनी दिले.
शहराच्या ज्या भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होतो त्या भागांमध्ये सुरळीत पुरवठ्यासाठी उपाययोजना कराव्यात. पाईपलाईनची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि पाणीपुरवठा विभागासाठी आवश्यक मनुष्यबळ मिळण्यासाठी सरकारी स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली.
अमृत योजनेअंतर्गत शहरात सुरू असलेल्या ड्रेनेज पाईपलाईनच्या कामाची पाहणी केलीं. पंचगंगा प्रदूषणाला आळा करण्यासाठी शहरातील ड्रेनेज व्यवस्था सक्षम करावी आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा अशा सूचना आमदार महाडिक यांनी दिल्या.यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत पुईखडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता हर्षजीत घाटगे उपस्थित होते.