टिप्पर चालकांच्या हजेरीचे पुस्तक गहाळ, ठेकेदारांना नोटीसा देऊनही रेकॉर्ड सादर नाही
schedule24 Dec 24 person by visibility 69 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रत्यक्षात १८० ते १९० टिप्पर चालक असताना २५४ चालकांचे पगार उचलून ठेकेदारांकडून कोटयवधी रुपयांचा ढपला पाडल्याची चर्चा असताना या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. टिप्पर चालकांची हजेरी मांडणारी फाळणी पुस्तक गहाळ असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी समोर आला. आम आदमी पक्षाने या विषयी पाठपुरावा सुरू केला आहे. आपच्या पदाधिकाऱ्यांची, याप्रश्नी महापालिकेचे अतिरिक्त राहुल रोकडे यांच्या सोबत बैठक होती. या बैठकीत अपुरे रेकॉर्ड सादर करण्यात आले. याप्रकरणी महापालिका आयुक्तांना वस्तुनिष्ठ अहवाल देणार असल्याचे अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले.
या बैठकीत आपने, फाळणी पुस्तक व हजेरी वही मध्ये तफावत निदर्शनास आणून दिली. प्रत्यक्ष १८० ते १९० चालक उपस्थित असताना २५४ चालकांचे पगार उचलले. एप्रिल ते नोव्हेंबर पर्यंतच्या नोंदी तपासण्यासाठी या बैठकीस फाळणी पुस्तक घेऊन येण्यास सांगितले होते. परंतु अधिकारी, कर्मचारी पुस्तक घेऊन आले नाहीत. अतिरिक्त आयुक्त यांनी सहाय्यक आयुक्तांना फाळणी पुस्तक ताब्यात घेण्यास सांगितले. त्यांनी पुस्तक आणण्यास सांगितले. मुकादम संग्राम यांनी केएमटी वर्कशॉप, सर्व कंत्राटदार यांचे ऑफिस, संबंधित कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली परंतु पुस्तक सापडले नाही.त्यामुळे टिप्पर चालकांच्या रोजच्या कामाची नोंद असणारे फाळणी पुस्तक गहाळ झाल्याचे स्पष्ट होत आहे. असे आपच्या पदाधिकाऱ्यांनी उपायुक्तांसमोर मुद्दा मांडला.
याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त रोकडे यांनी, सहा कंत्राटदारांना यापूर्वी दोन नोटीस काढून सर्व रेकॉर्ड सादर करण्यास सांगितले. परंतु त्यांनी अपुरे रेकॉर्ड सादर केले गेल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. यावर चुकीचे रेकॉर्ड सादर करणे, बँक स्टेटमेंट जमा न करणे, महिन्याचा पगार सात तारखेपर्यंत न करणे, सही केले हजेरी मस्टर महापालिकेला जमा न करणे, महापालिकेची फसवणूक करून २५४ चालकांचे बिल उचलणे हे मुद्दे चौकशी अहवालात घ्यावेत अशी मागणी आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली. यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, दुष्यंत माने, विजय हेगडे, मयुर भोसले, आदी उपस्थित होते. यावेळी सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे उपस्थित होत्या.