आदर्श नागरिक घडविण्यात क्रीडा शिक्षकांचे महत्त्वाचे योगदान- आर. व्ही. कांबळे
schedule24 Dec 24 person by visibility 70 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, कोल्हापूर व माणदेशी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील भुदरगड,कागल,करवीर,पन्हाळा, हातकांणगले व कोल्हापूर महानगरपालिकेकडील उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षकाना निवासी क्रीडा प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचे प्रभारी प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये शिबिराचा समारोप झाला.
याप्रसंगी प्रभारी प्रशासनाधिकारी कांबळे म्हणाले, ‘आदर्श व्यक्तिमत्व विकासात विविध क्रीडा प्रकारांचे व क्रीडा शिक्षकाचे अनन्य साधारण महत्व आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन हेच विद्यार्थी राष्ट्र उभारणीसाठी सक्षम बनविण्याचे महान कार्य शिक्षकांनी करायचे आहे.” फाऊंडेशनचे संचालक ओंकार गोंजारी यांनी प्रशिक्षणाचा आढावा सादर केला.
पाच दिवस निवासी प्रशिक्षणाअंतर्गत शिक्षकाना कबड्डी, खो-खो ,पोषणमूल्य युक्त आहार,ऍथलेटिक्स ट्रॅक आणि फील्ड,पोक्सो कायदा, सामाजिक जाणीव व खेळातून विकास अशा विविध विषयांचा समावेश होता. याप्रसंगी प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर व हिंदरत्न प्रकाशबापू पाटील ब्लड बँक सांगली यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर झाले. यामध्ये ३४ जणांनी रक्तदान केले.
संतोष डवरी, शबाना अपराध यांनी प्रशिक्षण कालावधीतील अनुभव सांगितले. बाबू गवंडी यांनी प्रास्ताविक केले. प्रशिक्षणार्थी तानाजी पोवार यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर पाटील यांनी आभार मानले. समारोप कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब कांबळे, शिक्षण निरीक्षक रावसाहेब पाटील, सचिन पांडव उपस्थित होते.