नाळ कोल्हापूरच्या मातीशी जुळलेली…नाते जडलेले आकाशाशी !
schedule20 May 25 person by visibility 176 categoryसामाजिक

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : डॉ. जयंत विष्णू नारळीकर, एक बहुआयामी व्यक्तिमत्व. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ. विज्ञानवादी प्रचारक. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी म्हणून सहजसोप्या भाषेत विज्ञानाची मांडणी करणारे ख्यातनाम लेखक. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष. वयाच्या ८७ व्या वर्षी, १९ मे २०२५ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. खगोलीय संशोधन क्षेत्रात स्वत:चं अवकाश निर्माण करणारा हा जगदविख्यात तारा कोल्हापूरचा सुपूत्र. कोल्हापूरच्या मातीशी नाळ जुळलेली आणि नाते जडलेले आकाशाशी…! हे व्यक्तिमत्व.
डॉ. नारळीकर यांच्या संशोधनाचा आवाका मोठा. त्यांनी, भारतीय खगोलशास्त्राचा पाया घातला. केंब्रिज विद्यापीठातील हा उच्चशिक्षित तरुण, १९७२ मध्ये भारतात परतला. १९८८ मध्ये त्यांची आयुका संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती झाली. तत्पूर्वी केंब्रिज विद्यापीठात असताना त्यांनी खगोलशास्त्रज्ञ फ्रेड हॉईल यांच्यासोबत काम केले. हॉईन -नारळीकर ही थिअर मांडली. गणितज्ज्ञ वडिल डॉ. विष्णू वासुदेव नारळीकर संशोधनाचा वारसा लाभला लाभलेला. डॉ. विष्णू नारळकीर हे हे वाराणसीच्या हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक. आई सुमती या संस्कृत अभ्यासक. डॉ. जयंत नारळीकर यांनी ‘चार नगरातलं माझं विश्व’या आत्मचरित्रात संपूर्ण आयुष्याचा पट मांडला आहे. या आत्मचरित्रात त्यांनी कोल्हापूरच्या आठवणी उलगडल्या आहेत.
‘नारळीकर कुटुंबीय हे मूळचे पाटगाव येथील. १९ जुलै १९३८ रोजी जयंत नारळीकर यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण वाराणसीत झाले. विद्यापीठ हायस्कूल आणि राजाराम हायस्कूलमध्येही काही काळ शिकले. मॅट्रिकला ते अव्वल होते. काही काळ ते मुंबईतही शिकले. डॉ. नारळीकर यांनी आत्मचरित्रात कोल्हापुरातील असंख्या आठवणी नोंदल्या आहेत. सुट्टीच्या कालावधीत कोल्हापुरातील गमंतीजमंती, भेंडे गल्ली येथील हुजुरबाजार वाडा येथील नातेवाईक. डॉ. नारळीकर यांचे वडील हे विद्यापीठ हायस्कूलचे संचालक होते. कोल्हापूरला आल्यानंतर नारळीकरांनी अनेकवेळा विद्यापीठ हायस्कूला भेटी दिल्या आहेत. २००६ मध्ये त्यांनी नारळीकरांचे मूळ गाव असलेल्या पाटगावलाही पत्नी मंगलासोबत भेट दिली होती.’ अशा असंख्य आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत.
२०१५ मध्ये ते शिवाजी विद्यापीठाच्या ५१ व्या दीक्षांत समारंभाला ते प्रमुख पाहुणे होते. २९ जानेवारी २०१५ रोजी झालेल्या या दीक्षांत समारंभात डॉ. डी. वाय. पाटील यांना डीलिट पदवी प्रदान करण्यात आली होती. डॉ. नारळीकर यांचे वैशिष्टये म्हणजे, त्यांनी सहजसोप्या भाषेत विज्ञान लहानमुलांपर्यंत पोहोचविले. विज्ञानाची गोडी लावली. विज्ञानाचा प्रसार करण्याचे मोठं काम केले. विज्ञानविषयक पुस्तके लोकप्रिय ठरली. ‘अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, वामन परत न आला, यक्षांची देणगी, चला जाऊ अवकाश सफरीला विज्ञान कथा संग्रह प्रकाशित आहेत. ‘आकाशाशी जडले नाते, सुर्याचा प्रकोप, विश्वाची रचना, विज्ञानाची गरुडझेप’ ही विज्ञानविषयक पुस्तके गाजली. ‘चार नगरातील माझे विश्व’ या त्यांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.नाशिक येथे २०२१ मध्ये झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र सरकारने २०१० मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी सन्मानित केले होत. भारत सरकारने त्यांना पदमभूषण आणि पद्मविभूषण या नागरी पुरस्कारांनी गौरव केला होता. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त या व्यक्तिमत्वाचा २००१ मध्ये येथील राजर्षी छत्रपती मेमोरियल ट्रस्टचा मानाचा व प्रतिष्ठेचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ देऊन सन्मानित केले होते.