कोल्हापूरच्या मातीत शक्ती मोठी-गंध वेगळा ! दादा कोंडकेंनी सिनेमाची वाट दाखविली, जयप्रभाने मला घडविलं : रामदास फुटाणे
schedule25 Aug 25 person by visibility 184 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘सामना हा सिनेमातील सत्तेतील प्रवृत्ती आणि सत्तेपासून बाजूला फेकलेली प्रवृत्ती यावर भाष्य करणारा आहे. हा सिनेमा सुरुवातीला फ्लॉप गेला. प्रेक्षक गाणी सुरू झाली की थिएटरमध्ये बसायचं. आणि गाणी संपली की पुन्हा बाहेर पडत. मात्र बर्लिन चित्रपट महोत्सवात हा सिनेमा झळकला…पुढे इतिहास घडत गेला…तीन राष्ट्र्रीय पुरस्कार, तीन फिल्मफेअर, आंतरराष्ट्रीय महोत्सवात पुरस्कार अशी कामगिरी करणारा हा पहिलाच मराठी सिनेमा. जगभर गाजलेल्या या सिनेमाचे बहुतांश चित्रीकरण कोल्हापूर परिसरात झाले. कोल्हापूरच्या मातीचा गंध वेगळा आहे, या मातीत शक्ती मोठी…! दादा कोंडकेंनी मला सिनेमाची वाट दाखविली…जयप्रभा स्टुडिओने मला घडविलं !!
प्रसिद्ध वात्रटिकाकार, चित्रपट निर्माते रामदास फुटाणे हे सामना सिनेमाच्या निर्मितीची प्रक्रिया उलगडत होते.आणि सुवर्णमहोत्सवी साजरे करणाऱ्या या सिनेमाच्या कहाणीत प्रेक्षक हरवून गेले. निमित्त होतं, दिनमान साहित्य उत्सवाचे. कोल्हापुरात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या साहित्य उत्सवाच्या पहिल्या दिवशी रामदास फुटाणे यांची प्रकट मुलाखत झाली. कवी अरुण म्हात्रे आणि अभिनेता सागर तळाशीकर यांनी मुलाखत घेतली. शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम झाला.
फुटाणे हे मूळचे मराठवाडयातील. नोकरीनिमित्त मुंबईला. चित्रकला शिक्षक. महिन्याला साधारणपणे साडेतीनशे पगार. सिनेमा निर्मितीकडे पावले कशी वळली ? असा प्रश्न करत म्हात्रे यांनी मुलाखतीला सुरुवात केली. फुटाणे म्हणाले, ‘आचार्य अत्रे यांच्या ‘मी कसा घडलो ?’ हे साहित्य माझ्यासाठी प्रेरणादायी होते. शाहीर व अभिनेता दादा कोंडके यांनी मला सिनमाची वाट दाखविली. ते म्हणाले, नोकरी सोडा, सिनेमा काढू. रजा काढून त्यांच्यासोबत मी, कोल्हापुरात आलो. जयप्रभा स्टुडिओत पोहोचलो. सोंगाडया, एकटा जीव सदाशिव करताना आपणही काही तरी करू असे वाटू लागलं. मी, सिनेमाची जुळवाजुळव करत होतो. मी, मनाशी एक खूणगाठ बांधलेली, जे करायचं ते वेगळे. त्याशिवाय आपलं स्थान निर्माण होणार नाही अशी. सिनेमा हा खर्चिक. शिक्षक म्हणून पगार कमी असला तरी सिनेमा काढायचं ठरविलं होतं, जरी सिनेमा फ्लॉप झाला , कर्ज झालं तरी त्या कर्जाची परतफेड कशी करायची हा प्लॅन तयार केला होता.
सिनेमा तयार करताना निर्माते पहिल्यांदा नट-नट्या निवडतात. मी, मात्र लेखक निवडला. विजय तेंडुलकर. त्यांचे ‘अशी पाखरे येती‘हे नाटक पाहिलेलं.यामुळे लेखक, पटकथा लेखक म्हणून त्यांनाच घ्यायचं हे मी ठरविलेलं. तेंडुलकर हे अवतीभवतीच्या मूलभूत प्रश्नांचा शोध घेणारे लेखक. यामुळे तेच मला हवे होते. पहिल्यांदा त्यांनी पटकथा लेखनाला नकार दिला. वर्षभर थांबलो. नंतर तयार झाले. दिग्दर्शक म्हणून जब्बा पटेल डोळयासमोर होते. त्यांनी दिग्दर्शन केलेला ‘घाशीराम कोतवाल’नाटक मी पाहिलं होतं. तेंडुलकरांच्या लेखनाचा नेमका अर्थ जब्बारच प्रेक्षकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणार याची खात्री होती. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्यासोबतही सिनेमा निर्मितीसंबंधी चर्चा केली. जयप्रभा स्टुडिओतच या सिनेमाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त झाला. पार्श्वगायिका लता मंगेशकर यांच्या हस्ते सिनेमाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ झाला. यावेळी चंद्रकांत मांडरे देखील उपस्थित होते. ’मुलाखती दरम्यान फुटाणे यांनी सिनेनिर्मितीच्या विविध आठवणी शेअर करत उपस्थितांना वेगळी अनुभूती दिली.
‘निर्मितीचा खर्च लाखात, आणि सिनेमा फ्लॉप…अशी स्थिती बनली. कर्जबाजारी झालो. सुरुवातीला सिनेमा चालला नाही. हे कर्ज फेडण्यासाठी कवितांचे कार्यक्रम सुरू झाले. सप्टेंबर १९८६ मध्ये ‘भारत कधी कधी माझा देश आहे.’हा व्याख्यान-कविताचा कार्यक्रम सुरू केला. हा कार्यक्रम सुरू करुन यंदा चाळीस वर्षे होत आहेत. पहिले व्याख्यान सोलापुरात झाले. ५५ मिनिटे व्याख्यान दिलं. तेव्हा निर्मलकुमार फडकुले म्हणाले, ‘हा कार्यक्रम दीड तासाचा करा, यामध्ये आणखी मसाला भरा.’ पुढे हा कार्यक्रम देश-विदेशात गाजला. परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या, व्यंगात्मक कविता सादर करत होतो. त्याला गंभीर स्वरुप दिलं. पानांच्या-फुलांच्या, प्रेमाच्या कविता मी कधीच केल्या नाहीत. तो माझा प्रांतही नाही. ’असेही त्यांनी स्पष्ट केले.
……………
मोठया माणसांचा सहवास घडला की आपलं खुजेपण जाणवतो
मुलाखती रामदास फुटाणे म्हणाले ‘आयुष्यात काय करायचं नाही हे सुद्धा मी ठरविलं होते. सिनेमा, साहित्याच्या माध्यमातून मोठया व्यक्तिमत्वांशी माझा स्नेह जुळला. त्यांना ऐकायला, भेटायला मिळालं. मोठया माणसांच्या सहवासात आलो की आपणं किती खुजे आहोत याची जाणीव व्हायची. जेव्हा खुजेपणाची जाणीव सतावते तेव्हा किंचित उंची वाढू लागते अशी माझी धारण आहे. ’असे फुटाणे यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या राजकारणाला यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत चेहरा दिला. पुढे शरद पवारांनी तो चेहरा जपला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, माजी उपमुख्यमंत्री गोपिनाथ मुंडे यांच्याशी मित्रत्वाचे नातं तयार झालं. त्यांचा स्नेह लाभला. या राजकीय मंडळीवरही मी कवितेतून भाष्य केलं. मात्र ही सारी मोठया मनाची माणसं. त्यांनी कधी मनात राग धरला नाही.’
……………..
आयुष्यात आनंदाचे विषय खूप आहेत….जिद्द हवी नक्कीच यश मिळते
फुटाणे म्हणाले, ‘शहरी आणि ग्रामीण भागात फरक आहे. शहरी जीवन हे वनबीएचके, टूबीएचके, लोकल या पुरतेच मर्यादित. याउलट ग्रामीण भागात जीवनाची समृद्ध अनुभूती मिळते. आयुष्यात जगण्याची दिशा ठरायला हवी. काय करायचं जस आपण ठरवितो, तसे काय करायचं नाही हे पक्क असावं. आनंदी जीवनाचे, यशस्वी जीवनाचे खूप विषय आहेत. तांबडा-पांढरा रस्सा आणि क्वाटर-कोंबडी म्हणजे सगळं आनंद नव्हे. कोल्हापूरच्या मातीचा गंध वेगळा आहे, या मातीची शक्ती खूप मोठी आहे. अनेक क्षेत्रात कर्तबगारी सिद्ध केली आहे. तरुण पिढीला इतकंच सांगणं आहे, आयुष्यात जिद्द हवी, कष्टाची जोड हवी. यश नक्कीच मिळते.’