आंदोलनासाठी जमलेले मनसेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
schedule01 Sep 25 person by visibility 118 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलमधील वैद्यकीय साहित्य खरेदीतील घोटाळाप्रश्नी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी जमलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी (३१ ऑगस्ट २०२५) दुपारी चार वाजता हे कार्यकर्ते सीपीआर येथे जमले होते. अधिष्ठाता सत्यवान मोरे यांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभालाही मनसेने विरोध दर्शविला होता. वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करणारा वादग्रस्त ठेकेदार मयूर लिंबेकर व अधिष्ठाता मोरे यांचा एका कॅफेमधील कॉफी पितानाचा व्हिडिओ मनसेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करत कारवाईची मागणी केली होती. अधिष्ठाता मोरे हे ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसेने विरोध केला होता. दरम्यान या कालावधीत सीपीआर येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा कार्यक्रम होता. पोलिसांनी आंदोलनाच्या पावित्र्यातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजीत राऊत, शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे, अभिजीत पाटील, निलेश धुम्मा, निलेश आजगावकर, सागर साळोखे, संज्या चौगुले, उत्तम वंदुरे, सुनील तुपे,सुधीर कोठावळे, प्रशांत माळी, अरविंद कांबळे आदीं कार्यकर्त्यांचा समावेश होता.