पाइपलाइन योजनेवरुन काँग्रेस-भाजपमध्ये वाकयुद्ध, काँग्रेसच्या चर्चेच्या आव्हानाला जयंत पाटलांचे प्रत्युत्तर
schedule01 Sep 25 person by visibility 42 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : थेट पाइपलाइन योजनेवरुन काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आमनेसामने उभे ठाकले आहेत. योजनेतील त्रुटी, शहराचा काही दिवस खंडित झालेला पाणीपुरवठा यावरुन या दोन्ही पक्षांमध्ये आता वाकयुद्ध सुरू आहे. या योजनेत भ्रष्टाचार झाला असून त्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेवकांनी केला. त्याला काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी ‘एसआयटीच काय सीबीआय चौकशी करा’असे खुले आव्हान दिले होते. दरम्यान प्रा. जयंत पाटील यांनी, पुन्हा एकदा थेट पाइपलाइन योजनेवरुन काँग्रेसच्या नेते मंडळीवर टीकास्त्र सोडले आहे. नेत्यांवरील आरोप नगरसेवकांनी आपल्यावर ओढवून घेऊ नयेत. त्याचबरोबर ज्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यांना चर्चा करावयास अंबाबाई मंदिर लांब पडत असेल तर आम्ही कसबा बावड्यातील हनुमान मंदिरात चर्चेला आणि शपथ घेण्यासाठी यायला तयार आहोत असे उत्तर प्रा. पाटील यांनी दिले आहे.
प्रा. जयंत पाटील यांनी भाजप, ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांसोबत पत्रकार परिषदेत थेट पाइपलाइन योजना कशी कुचकामी ठरली हे सांगितले. त्यांनी केलेल्या आरोपांना काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी उत्तर देताना, ‘काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेतंर्गत कोल्हापूरला शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा मिळावा यासाठी आमदार सतेज पाटील यांनी आमदारकी पणाला लावली होती. याउलट भारतीय जनता पक्षाच्या मंडळींनी नेहमीच या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न कला. या योजनेत एक रुपयाही काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी घेतला नाही. तेव्हा या योजनेची एसआयटीच काय सीबीआय चौकशी करा. शिवाय करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात येऊन शथप घेऊ. त्याठिकाणी प्रा. जयंत पाटील यांनीही यावे. दूध का दूध आणि पानी का पानी होईल. प्रा. पाटील यांनी पहिल्यापासूनच योजना कशी रखडेल यासाठी प्रयत् केले. पाइपसह अन्य बाबींवर आक्षेप घेतला. त्यांचा अतिअभ्यास या योजनेसाठी मारक ठरला’ अशा शब्दांत उत्तर दिले होते.
यावर प्रा. जयंत पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘ सचिन चव्हाण हे स्थायी समिती सभापती असताना थेट पाईपलाईन योजनेला मंजूरी दिली गेली. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये या योजनेचा प्रस्ताव कोणतीही महत्वपूर्ण आणि तांत्रिक चर्चा न करता केवळ ३ मिनिटात मंजूर करण्यात आला. त्यावेळी स्थायी समितीच्या सदस्यांची घालमेल मी प्रत्यक्ष पाहिली आहे. त्यामुळे आमचा नगरसेवकांवर कोणताही आक्षेप नाही. माझा वैयक्तिक ड्रीम प्रोजेक्ट आहे असे सांगून, ज्यांनी सदस्यांना या पध्दतीने प्रस्ताव मान्य करायला लावला त्यांच्यावर केलेले आरोप, या नगरसेवकांनी आपल्यावर ओढवून घेऊ नयेत. त्याचबरोबर ज्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यांना चर्चा करावयास अंबाबाई मंदिर लांब पडत असेल तर आम्ही कसबा बावड्यातील हनुमान मंदिरात चर्चेला आणि शपथ घेण्यासाठी यायला तयार आहोत. पण नेत्याच्या संरक्षणासाठी नगरसेवकांना दाणीला देणे योग्य नाही, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्यांनी आमचे आव्हान स्विकारावे आणि चर्चेला यावे.’