डीवायपी ग्रुपचे ध्येय, जगातील टॉप ५०० विद्यापीठात स्थान ! कोल्हापुरात सर्वात उंच २३ मजली इमारत उभारणार!!
schedule01 Sep 25 person by visibility 158 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :‘डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला नॅक ए प्लस प्लस आणि क्यू एस आयगेज डायमंड मानांकन मिळाले आहे. यातून विद्यापीठाची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. यापुढे जागतिक क्रमवारीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या दोन वर्षात जगातील सर्वोत्तम ५०० विद्यापीठामध्ये स्थान मिळवण्याचे आमचे ध्येय आहे. तसेच कोल्हापुरात सर्वात उंच २३ मजली इमारत उभारत आहोत. हॉटेल सयाजी लगत असलेल्या हा इमारतीमध्ये सेव्हन स्टार सुविधा असतील. येत्या १८ महिन्यात या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले जाईल.’असे डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी पाटील यांनी सांगितले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या २० वा स्थापना दिन सोमवारी (एक सप्टेंबर २०२५) दिमाखदार सोहळयात साजरा झाला. याप्रसंगी कॉसमॉस बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए. मिलिंद काळे यांना डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती पाटील यांच्या हस्ते 'डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित केले. आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिसेसचे महासंचालक लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयल प्रमुख अतिथी होते. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, सल्लागार वृषाली पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. हॉटेस सयाजी येथे हा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी गेल्या चाळीस वर्षाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. डी. वाय. पाटील ग्रुपने शिक्षण व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण कार्य केले आहे. जे काम करायचे ते सर्वोत्कृष्ट असायला हवे ही आपली धारणा आहे. शिक्षण व आरोग्य क्षेत्रात काम करत असताना काही वर्षापूर्वी डीवायपी ग्रुपने हॉटेल व्यवसायात प्रवेश केला. हा आमच्यासाठी नवा प्रांत होता. हॉटेल सयाजीच्या माध्यमातून कोल्हापूरचा नावलौकिक उंचावण्याचा प्रयत्न केला. आता पाटील कुटुंबीयांची चौथी पिढी शिक्षण, आरोग्यसह समाजकार्यात सक्रिय आहे. कदमवाडी येथे मेडिकल कॉलेजची तेवीस मजली इमारत होत आहे. हॉटेल सयाजी लगतच तेवीस मजली इमारत होत आहे. कोल्हापुरातील सर्वात उंच इमारत असेल. हॉटेल सयाजीच्या या विस्तारीत इमारतीमध्ये सेव्हन स्टार सुविधा असतील. फेब्रुवारी महिन्यात कामाला सुरुवात झाली आहे. १८ महिन्यात हे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ’