पीएन पुत्रांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची तारीख ठरली ! राहुल-राजेश पाटलांची मुंबईत अजित पवारांशी भेट !!
schedule31 Jul 25 person by visibility 78 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : होणार, होणार… जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार ! अशी गेली बरेच दिवस रंगलेल्या चर्चेला गुरुवारी (३१ जुलै २०२५) पूर्णविराम मिळाला. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे हे दोन्ही पुत्र येत्या १९ किंवा २५ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षात प्रवेश करणार आहेत. या दोन्ही भावडांनी, मुंबईत राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती होती. तसेच पीएन पाटील गटाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. राहुल व राजेश पाटील यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश हा काँग्रेससाठी धक्का आहे.
याप्रसंगी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती बी. एच. पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक पी. डी. धुंदरे, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक सत्यजित पाटील, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भारत पाटील- भुयेकर, करवीर तालुका काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, भोगावतीचे साखर कारखान्याचे संचालक संचालक ए. डी. चौगुले, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक सत्यजित पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य चेतन पाटील, हंबीरराव वळके, गणेश आडनाईक आदी प्रमुख उपस्थित होते.