महादेवी गुजरातमध्ये पोहोचली, मग आमदार-खासदारांना जाग आली ! बैल गेला नि झोपा केला असा प्रकार !!
schedule31 Jul 25 person by visibility 481 categoryसामाजिक

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : धार्मिक समारंभ असो की उत्सव…त्या ठिकाणी तिचे आगमन झाले की कार्यक्रमाची उंची आपसूक वाढायची….सर्वधर्मियांना ती आपली वाटायची...रस्त्यावरुन निघाली की तिचा थाट पाहण्यासाठी आबालवृद्धांच पावलं थबकायची…आपोआप हात जोडले जायचे. जे काही जवळ असेल ते तिला खाऊ घालण्यासाठी प्रत्येकाची धडपड…कारण प्रत्येकाला ‘ती’आपल्या कुटुंबांतील सदस्य वाटे…मुका जीव असला तरी प्रत्येकासोबत नातं जुळलेलं होते…आपआपल्या परीने प्रत्येकजण तिच्याशी मनोमनी संवाद साधायचा…जवळपास ३५ वर्षे कोल्हापूरच्या मातीशी, नांदणी परिसरातील पंचक्रोशीसी समरस झालेली महादेवी हत्तीण दोन-तीन दिवसापूर्वी गुजरातमधील वनतारा प्रकल्पात दाखल झाली…सारा समाज हळहळला…रस्त्यावर उतरुन वाट अडविली…पण सुप्रीम कोर्टाचा आदेश अंतिम ठरला…जनभावना हरली. या घटनेला दोन दिवस झाले आणि जिल्ह्यातील आजी-माजी खासदार-आमदारांना जाग आली. कर्तव्या भावना जागी झाल्यासारखे आता ही मंडळी ‘महादेवी’ला परत आणणार अशा वल्गना करत आहेत.
गेली पाच वर्षे नांदणी मठ व्यवस्थापन ‘महादेवी हत्तीण’नांदणी मठातच राहावी यासाठी दिल्लीपर्यंत पाठपुरावा करत होती कायदेशीर मार्गाने लढा देत होती. मात्र या कालावधीत कोणीही, महादेवी हत्तीणसाठी त्यांच्या पाठीशी राहिल्याचे समोर आले नाही. आज विविध माध्यमाद्वारे महादेवी हत्तीणसाठी आपण धडपडतोय हे दाखविण्यासाठी राजकारणी सरसावले आहेत. ती दिलासा देणारी बाब असली तरी मात्र त्यांची ही कृती आता ‘बैल गेला आणि झोपा काढला…’या म्हणीच्या अर्थासारखी ठरतेय.एखादी गोष्ट घडून गेल्यावर त्यासाठी यातायात करण्यासारखी आहे. महादेवी हत्तीण विषयात जनभावना दडल्या होत्या. महादेवी हत्तीण येथील समाजजीवनाची एक ओळख बनली होती याचीही जाणीव संबंधिताना झाली नाही. आता कोण केंद्र व राज्य सरकाकडे पाठपुरावा करण्याची भाषा करत आहेत, कोण आंदोलनाचा इशारा देत आहेत, कोण सह्यांची मोहिम काढत आहेत… कोण लोकसभेत वाचा फोडणार असे म्हणत आहेत..वेळ निघून गेल्यावर त्यांच्याकडून ज्या गोष्टी सुरू आहेत त्यामध्ये किती प्रामाणिपणा, किती विश्वसनीयता ? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.
जिल्ह्यात दोन मंत्री, तीन खासदार, दहा आमदार…या साऱ्यांनी एकत्रित ताकत दाखविली असती तर नांदणी मठातच महादेवी हत्तीण राहिली असती. नांदणी येथील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठ संस्थानला तेराशे वर्षाचा इतिहास आहे. या मठात तब्बल चारशे वर्षापासून हत्ती जोपासण्याची परंपरा आहे. महादेवी हत्तीण वयाच्या सहाव्या वर्षी मठात दाखल झाली. तीन दशकाहून अधिक काळ मठात तिचे वास्तव्य होते. नांदणी पंचक्रोशीतील धार्मिक उत्सव, समारंभात तिची उपस्थिती प्रमुख पाहुण्यांच्या इतकीच महत्वाची ठरायची. पंचकल्याण महोत्सव, दत्त जयंती, शिवजयंती, आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत तिचा थाट, डामडौल डोळयात न मावणार. मुळात तिचं वास्तव्य, ऐटबाज चाल हे समृद्धीचे, भव्यतेचे लक्षण. नांदणी मठ व्यवस्थापन तिची देखभाल करायचा. आजारी पडली तर उपचार ठरलेले. देखभालीसाठी स्वतंत्र माहूत नेमलेला. तिच्या पालन पोषण व चाऱ्यासाठी सतरा एकर जमीन राखीव ठेवली होती. ती शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त राहावी यासाठी रोज दहा किलोमीटर प्रवास ठरलेला. मठातील धार्मिक कार्यक्रमात तिचा सहभाग ठरलेला. दरम्यान तिच्या प्रकृतीवरुन गेली काही वर्षे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महादेवीची मानसिक व शारिरीक तब्बेत खालावत चालल्याचे कोर्टापुढे मांडण्यात आले. मठ व्यवस्थापनकडून महादेवी हत्तीणची उत्तम देखभाल सुरू होती. उपचार वेळेवर व्हायचे. पण हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले. सुप्रीम कोर्टाचा आदेश हा अंतिम. कोर्टाच्या सुप्रीम आदेशानुसार काही दिवसापूर्वी महादेवी हत्तीण गुजरातमधील वनतारात पोहोचली. जीवापाड जपलेल्या महादेवीला निरोप देणं हे नागरिकांसाठी जड होते. महादेवी वनताराची वाट चालताना नागरिकांच्या डोळयातील अश्रू थांबत नव्हते. व्याकुळ नागरिक रस्त्यावर उतरले, पोलिस गाडया अडविल्या. महादेवीच्य आठवणींचा साठवण, डोळयात साठविलेले रुप सारं काही अस्वस्थ करणारं. जणू काळीज तुटल्याची अनुभती...विविध माध्यमातून जनता भावना व्यक्त करतेय. लोकभावनेला आता राजकीय आधार मिळतोय…हरलेली लढाई जिंकायची आहे !