महादेवी हत्तीणसाठी महाडिक भेटले केंद्रीय मंत्र्यांना, शेट्टींची रविवारी पदयात्रा ! सतेज पाटील देणार राष्ट्रपतींना निवेदन !!
schedule31 Jul 25 person by visibility 72 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या महादेवी हत्तीणला गुजरातवरुन परत आणावा यासाठी जनमताचा रेटा वाढत आहे. लोकभावनेपाठोपाठ आता राजकीय मंडळीही महादेवी हत्तीणसाठी सरसावली आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी लाखो सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठविणार असल्याचे सांगितले. माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पदयात्रेचे आयोजन केले आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी, केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन निवेदन दिले.
खासदार महाडिक यांनी नवी दिल्ली येथे वनमंत्री यादव यांची भेट घेऊन महादेवी हत्तीणीशी नागरिक व भाविकांच्या श्रद्धा जोडल्या आहेत. जनभावनेचा विचार करुन महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठाकडे सुपूर्द करावी. हत्तीणीचे आरोग्य रक्षण, पालन पोषणसाठी योग्य व्यवस्था केली जाईल. त्यासाठी आपण लक्ष ददेऊन हत्तीणसाठी अनुकूल वातावरण निर्माण करुन असे सांगितले. केंद्रीय वनमंत्र्यांनी,‘ सर्व कायदेशीर बाजू तपासून या प्रश्नी पुढील आठवडयात बैठक घेऊ. योग्य तोडगा निघण्यासाठी व महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू.’अशी ग्वाही दिली.
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी (३१ जुलै) नांदणी मठ येथे भेट दिली. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी लाखो भाविकांच्या सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठविणार आहे. पेटाच्या भूमिकेनंतर हत्तीणीला वनतारा येथे नेण्याची घटनाच संशयास्पद आहे. यामध्ये राजकारण करण्याची आपल ईच्छा नाही. मात्र लोकांच्या भावना देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. जैन धर्मीय आणि हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे महादेवीला परत आणण्यासाठी आता राष्ट्रपतींनीच हस्तक्षेप करावा यासाठी सह्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
महादेवी हत्तीणीला गुजरातला नेण्याच्या प्रकाराचा माजी खासदार राजू शेट्टी यांनी निषेध केला आहे. महादेवी हत्तीण परत करा या मागणीसाठी माजी खासदार शेट्टी हे रविवारी (३ ऑगस्ट २०२५) नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत पदयात्रा काढणार आहेत. पहाटे पाच वाजता नांदणी निशिधीका येथून पदयात्रेला प्रारंभ होईल. ४५ किलो मीटरची पदयात्रा आहे. महादेवी हत्तीण ही आमच्या धार्मिक संस्कृतीचा भाग आहे. श्रद्धेचे प्रतीक आहे ही लोकभावना आहे. महादेवी हत्तीणीला परत करा यासाठी रविवारी पदयात्रा निघणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
खासदार धैर्यशील माने यांनी महादेवी हत्तीण ही समाजजीवनाचा एक घटक आहे. श्रद्धेचा विषय आहे. आमच्या दृष्टीने हा विषय संवेदनशील आहे. महादेवी हत्तीण आणि नागरिक यांच्यामध्ये एक वेगळं नातं आहे. वेगळया भावना जोडलेल्या आहेत. महादेवी हत्तीण परत कोल्हापुरात पोहोच करावी यासाठी लोकसभेत आपण आवाज उठविणार आहोत. आमदार विनय कोरे यांनी ही महादेवी हत्तीणला गुजरातला पाठविण्याचा निर्णय हा अंत्यत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. महादेवी हत्तीणीला गुजरातला नेल्यामुळे समाजघटकाच्या भावना दुखावल्या आहेत. महादेवीबाबत लोकभावनेचा अनादर करण्यात आला. अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.