एनडीडीबीच्या चेअरमनांनी केले गोकुळचे कौतुक, भविष्यातही सहकार्याची ग्वाही
schedule01 Aug 25 person by visibility 41 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक यांनी नुकतेच गुजरात येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एन.डी.डी.बी) आनंदच्या प्रकल्पांना अभ्यासपूर्वक भेट दिली. तसेच खेडा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या परिसरातील प्रगत प्राथमिक दुग्ध संस्थांची पाहणी केली. यावेळी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड चे चेअरमन डॉ. मिनेश शहा व गोकुळ दूध संघाचे संचालक यांची बैठक झाली. एनडीडीबीकडून गोकुळला आवश्यक ते सहकार्य मिळाले असून भविष्यात हे सहकार्य अधिक व्यापक व प्रभावी स्वरूपात दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
एनडीडीबीचे चेअरमन डॉ. मिनेश शहा गोकुळ दूध संघ हा देशातील एक सकारात्मक दृष्टिकोन आणि आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणारा आदर्श सहकारी दूध संघ आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा घडवण्यासाठी गोकुळने घेतलेला पुढाकार उल्लेखनीय असून इतर संघांसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. गोकुळ चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, एनडीडीबीच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या योजनांचा तसेच नवीन प्रकल्पांचा अभ्यास हा गोकुळसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. आम्ही येथे पाहिलेल्या कामाकाजाची पद्धत, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या सगळ्याचा उपयोग करून गोकुळ संघाच्या कार्यपद्धतीत सकारात्मक बदल करू. याप्रसंगी गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले तसेच अमूल फेडरेशन कार्यकारी संचालक डॉ.अमित व्यास,एन.डी.डी.बी चे डॉ.श्रीधर, डॉ.श्रीनिवास, डॉ.राजेश, डॉ.शेटकर, मनोज मुदडा, नितीन ठाकरे व अधिकारी उपस्थित होते.