शिक्षक बँकेच्या चेअरमन-व्हाईस चेअरमनांची सोमवारी निवड ! शिवाजीराव रोडे-पाटील, गजानन कांबळेंची नावे चर्चेत !!
schedule30 Jul 25 person by visibility 96 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची प्रमुख आर्थिक संस्था असललेल्या दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी संचालक मंडळाची सोमवारी (४ ऑगस्ट २०२५) बैठक होत आहे. बँकेच्या सभागृहात दुपारी दोन वाजता होणाऱ्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी होतील. मावळते चेअरमन सुरेश कोळी व व्हाइस चेअरमन पद्मजा मेढे यांनी राजीनामा दिल्यामुळे या निवडी होणार आहेत.
सत्तारुढ राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीच्या फॉर्म्युलानुसार आता प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन शिक्षक संघ थोरात गटाला मिळणार आहे. शिक्षक संघाकडून शाहूवाडी तालुक्यातील संचालक शिवाजीराव रोडे-पाटील यांना चेअरमनपदी काम करण्याची संधी दिली जाणार असल्याचे वृत्त आहे. तर व्हाइस चेअरमनपदासाठी शिक्षक भारती या संघटनेचे व बँकेचे संचालक गजानन कांबळे यांचे नाव चर्चेत आहे. कांबळे हे गगनबावडा तालुक्यातील आहेत.
जून २०२२ मध्ये प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीने सतरा पैकी सतरा जागा जिंकल्या. शिक्षक संघाचे (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट) नेते राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा पराभव केला. सत्तारुढ राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीने गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत अनेकांना पदावर संधी असे सांगत कधी दहा महिन्याचा, कधी सहा महिन्याचा तर कधी साडे तीन महिन्याच्या कालावधीसाठी चेअरमन-व्हाइस चेअरमन निवडले. तीन वर्षाच्या कालावधीत सहा चेअरमन झाले. पहिल्यांदा शिक्षक समितीचे अर्जुन पाटील, त्यानंतर शिक्षक संघाचे सुनील एडके चेअरमन झाले.
या सभागृहातील तिसरे चेअरमन शिक्षक समितीचे संचालक राजेंद्र पाटील झाले. यानंतर शिक्षक संघाचे संचालक बाळासाहेब निंबाळकर चेअरमनपदी काम केले. संचालक बाळकृष्ण हळदकर यांचीही चेअरमनपदी निवड झाली. १५ एप्रिल २०२५ रोजी संचालक सुरेश कोळी यांची चेअरमनपदी निवड झाली. दुसरीकडे तींन वर्षाच्या कालावधीत संचालक पद्मजा मेढे व रामदास झेंडे हे प्रत्येकी दोन वेळा व्हाइस चेअरमन झाले. तर संचालक अमर वरुटे यांनी एकदा व्हाइस चेअरमनपद झाले. विद्यमान चेअरमन कोळी व व्हाइस चेअरमन मेढे यांनी या आपआपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे येत्या चार ऑगस्ट रोजी चेअरमन व व्हाइस चेअरमन निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक होत आहे. तत्पूर्वी रविवारी (तीन ऑगस्ट ) सुकाणू समितीची बैठक होत आहे. त्यामध्ये नूतन चेअरमन व व्हाइस चेअरमन यांची नावे निश्चित होतील.