गणेशोत्सवासाठी पुणे –कोल्हापूर विशेष रेल्वे सुरू करा- आमदार सतेज पाटील
schedule23 Aug 25 person by visibility 74 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातून कोल्हापूर, सांगली सातारा जिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात पुणे-कोल्हापूर या मार्गावर विशेष रेल्वे गाड्या सुरु करा, अशी मागणी काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पत्रात म्हंटले आहे की, कोकणासाठी रेल्वेकडून २५० ‘गणपती स्पेशल’ गाड्या चालविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्याच धर्तीवर पुणे-कोल्हापूर दरम्यान देखील गणेशोत्सव काळात विशेष गाड्या चालवाव्यात. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात पुणे व कोल्हापूर दरम्यान प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असते. या गर्दीमुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड ओव्हरक्राउडिंग होते व खासगी बसचे भाडे भरमसाठ वाढते. त्यामुळे कामगार व मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक ताण येतो. सार्वजनिक सोयीसुविधा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने गणेशोत्सव काळात पुणे-कोल्हापूर दरम्यान विशेष गाड्या चालवल्यास सातारा, कराड, सांगली, मिरज व कोल्हापूर येथून पुण्यात नोकरी-व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या हजारो लोकांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे गणेशोत्सव काळात पुणे-कोल्हापूर मार्गवर विशेष रेल्वे सुरु करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली.