स्मिता गौड यांच्या माझे शाळेतील प्रयोग या पुस्तकास लक्षवेधी ग्रंथ पुरस्कार
schedule08 Jan 25 person by visibility 79 categoryशैक्षणिकक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शिक्षण विभागाच्या सहाय्यक संचालिका स्मिता गौड यांनी लिहिलेल्या 'माझे शाळेतील प्रयोग' या पुस्तकास यशवंतराव चव्हाण सेंटर शिक्षण विकास मंचतर्फे 'डॉ.कुमुद बंसल लक्षवेधी शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार' मिळाला. मुंबई येथे झालेल्या समारंभात सेंटरच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे व ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते गौड यांनी पुरस्कार स्वीकारला.
यावेळी राज्याचे माजी शिक्षण संचालक व सेंटरचे मुख्य संयोजक डॉ.वसंत काळपांडे,बसंती रॉय, दीप्ती नाखले,योगेश कुदळे उपस्थित होते.माझे शाळेतले प्रयोग हे पहिली ते चौथीच्या वर्गास शिकवणाऱ्या एका शिक्षिकेचे शैक्षणिक प्रवास वर्णन आहे. तीनशे किलोमीटर प्रवास करून लेखिका पुण्याहून गडहिंग्लज तालुक्यातील नांगनूर या गावातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून रुजू होते, तेथून हा प्रवास सुरू होतो आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिक्षणाधिकारीपदी निवड झाल्यानंतर ती पुन्हा पुण्यात परतते तेथे तो संपतो.
दरम्यानच्या पंधरा वर्षात घडलेली शिक्षणापासून शिक्षणापर्यंतची ही गोष्ट आहे.शाळेशी, विद्यार्थ्यांशी, गावाशी जोडले गेलेले ऋणानुबंध हा कथानकाचा पाया असला तरी वर्गात प्रत्यक्ष घडलेली अध्ययन-अध्यापन प्रक्रिया हा विषयाचा गाभा आहे. शिकणे सर्वांगसुंदर व्हावे यासाठी वर्गात वापरलेली तंत्रे, क्लुप्त्या व उपक्रम पुस्तकात जागोजागी सापडतात. विविधांगी शिक्षकभान जोपासताना केलेले चिंतनही अधून मधून डोकावते. लेखिकेने स्वतः विद्यार्थी, शिक्षिका, पालक आणि प्रशासक अशा चौरंगी भूमिकेतून तटस्थपणे अनुभवलेल्या शिक्षणाचा लेखाजोखा या पुस्तकात मांडलेला आहे.