भारतीय मजदूर संघांच्या पदाधिकाऱ्यांची कामगारमंत्र्यांच्यासोबत बैठक
schedule09 Jan 25 person by visibility 210 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय मजदूर संघ, विदर्भ प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांनी कामगारमंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन विविध प्रश्नासंबंधी चर्चा केली. याप्रसंगी मंत्री फुंडकर यांनी,‘राज्यातील प्रत्येक कामगाराचा विकास हा केवळ आर्थिक पातळीवर नाही तर सामाजिक, मानसिक आणि शारीरिक पातळीवरही होण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. मंत्रालयात ही बैठक झाली.
भारतीय मजदूर संघाचे क्षेत्रीय संघटन मंत्री सी. व्ही.राजेश, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड अनिल ढुमणे, प्रदेश महामंत्री श्री किरण मिलगीर ,विदर्भ प्रदेश अध्यक्ष रवींद्र गणेशे , महामंत्री गजानन गटलेवार उपस्थित होते. असंघटित कामगारांच्या विकासासाठी निधी उभारण्याचे नियोजन असून या निधीच्या माध्यमातून असंघटित कामगारांसाठी विमा, आरोग्य या योजना राबवण्याच्या शासनाच्या विचाराधीन असल्याचे मंत्री फुंडकर यांनी सांगितले.
चर्चेत भारतीय मजदुर संघ प्रदेश संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ, प्रदेश सचिव विशाल मोहिते,अखिल भारतीय ठेका मजदुर महासंघाचे अखिल भारतीय महामंत्री सचिन मेंगाळे,पुणे जिल्हा सेक्रेटरी सागर पवार, असंघटित क्षेत्र सहप्रभारी श्रीपाद कुटासकर, हर्षल ठोंबरे, कोषाध्यक्ष बाळकृष्ण कांबळे, घरेलु कामगार संघ प्रदेश अध्यक्ष शर्मिला पाटील, सरचिटणीस संजना वाडकर, प्रदेश सचिव व प्रदेश बांधकाम संघटनेचे अध्यक्ष हरी चव्हाण उपस्थित होते.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी, सरकारने कामगार विषयक धोरण तयार करावे, भगवान श्री विश्वकर्मा जयंती राष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करावा. वीज उद्योगासाठी कार्यपध्दती , धोकादायक उद्योग म्हणून किमान वेतन कायद्यानुसार स्वंतत्र वेतन श्रेणी निर्माण करावी. सुरक्षा रक्षकांना स्वंतत्र वेतन श्रेणी तयार करून किमान वेतन जाहीर करावे. प्रलंबित किमान वेतन दर त्वरित घोषित करून कामगारांना न्याय द्यावा. बिडी कामगारांच्यासाठी किमान वेतन अमलबजावणी करिता त्रिपक्षीय बैठक आयोजित करून कामगारांना न्याय द्यावा यासह नऊ मागण्यांचे निवेदन दिले.