गोकुळमार्फत लवकरच जनावरांसाठी प्रेग्नेंसी रेशन पशुखाद्य - चेअरमन नविद मुश्रीफ
schedule21 Aug 25 person by visibility 93 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “ गोकुळ दूध संघाच्या म्हैस दूध वाढीसाठी सामुदायिक प्रयत्न गरजेचे आहेत. यासाठी जातिवंत म्हैस खरेदी, वासरू संगोपन, किसान विमा पॉलिसी, मिनरल मिक्चर अनुदान योजना यांसारख्या विविध योजनांचा लाभ उत्पादकांनी घ्यावा. गोकुळच्या वतीने गाभण जनावरांसाठी ‘प्रेग्नेंसी रेशन’ पशुखाद्य लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत ‘हिप्पर रिडिंग प्रोग्रॅम’ (जातिवंत म्हैस रेडी संगोपन केंद्र) मोठ्या प्रमाणात राबवले जाणार असून शेतकऱ्यांना दर्जेदार जातिवंत जनावरे सहज उपलब्ध होतील.”असे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाशी संलग्न शिरोळ तालुक्यातील प्राथमिक दूध संस्थांची संपर्क सभा उदगाव येथील कल्पवृक्ष सांस्कृतिक भवन येथे झाली. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. संपर्क सभेत दूध संस्था प्रतिनिधींनी विविध मागण्या मांडल्या. जुने मिल्को टेस्टर जमा करण्यासंदर्भात धोरण तयार करणे, सुक्या वैरणीस अनुदान वाढवणे, शिरोळ सेंटरवर ब्लड टेस्ट मशीन उपलब्ध करणे, पशुवैद्यकीय कॉल सेंटर स्थापन करणे, दूध संस्थांच्या वार्षिक घटवाढीचा अहवाल उपलब्ध करून देणे आदी मागण्यांचा समावेश होता. तसेच किसान विमा पॉलिसीचा कालावधी तीन वर्षांचा करावा अशीही मागणी करण्यात आली. बबनराव चौगले (दत्तवाड), बाळासो माळी (हेरवाड), आप्पासो गावडे (शिरोळ), आप्पा पाटील (अ.लाट), जालंदर संकपाळ (घोसरवाड), उमेश पाटील (टाकळी), अजित कुपवडे (कनवाड) या संस्था प्रतिनिधींनी प्रश्न विचारले.
संचालक डॉ.सुजित मिणचेकर यांनी स्वागत केले. संचालक मुरलीधर जाधव यांनी आभार मानले. श्री.धनश्री दूध संस्थेचे चेअरमन सुभाष शिरगावे यांच्या हस्ते चेअरमन मुश्रीफांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, रणजितसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके, युवराज पाटील, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले उपस्थित होते.