Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात क्रांतिअग्रणी जी.डी. लाड अध्यासन केंद्राची सुरुवात, सोमवारी विशेष कार्यक्रमबहरलेली परसबाग पाहून सुखावले अधिकारी, सडोली खालसा केंद्र शाळेला भेट !कोल्हापुरात रविवारी -सोमवारी रंगणार साहित्यिक - कलावंतांची मैफलगोकुळमार्फत लवकरच जनावरांसाठी प्रेग्नेंसी रेशन पशुखाद्य - चेअरमन नविद मुश्रीफसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजनकंपनी सेक्रेटरी  रोजगाराचे उत्तम क्षेत्र- कौस्तुभ गावडेकोल्हापूर इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांची डोळे तपासणीअजित पवारांचे जंगी स्वागत करणार, दौऱ्याची राष्ट्रवादीकडून जय्यत तयारी ! पुईखडी ते सडोली खालसा मोटारसायकल रॅली!!पंचगंगेने गाठली धोक्याची पातळी, चिखलीतील पूरग्रस्तांचे स्थलांतरपंचगंगा सरकतेय धोका पातळीकडे, कोल्हापुरला पुराचा धोका ! ३५ नागरिकांचे स्थलांतर, पाच हॉस्पिटल्सना नोटिस, नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली!!

जाहिरात

 

कोल्हापुरात रविवारी -सोमवारी रंगणार साहित्यिक - कलावंतांची मैफल

schedule21 Aug 25 person by visibility 71 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन  प्रतिनिधी कोल्हापूर :  महाराष्ट्र दिनमानच्यावतीने येथे २४ व २५ ऑगस्ट 2025 रोजी दिनमान साहित्य उत्सवाचे आयोजन केले  आहे. कोल्हापुरात प्रथमच होणा-या अशा प्रकारच्या या उपक्रमामध्ये हिंदी, मराठीतील नामवंत साहित्यिक, कलावंत सहभागी होत आहेत. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात हा उत्सव रंगणार आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या गौरवार्थ साहित्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून डी. वाय. पाटील ग्रूपने या दर्जेदार उपक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. रविवारी २४ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता `पडद्यामागचा सामना` हा कार्यक्रम होईल. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक सन्मान मिळवलेल्या `सामना` या चित्रपटाला यंदा पन्नास वर्षे झाली, त्यानिमित्त या चित्रपटाचे निर्माते रामदास फुटाणे यांच्या मुलाखतीतून सामनाच्या निर्मितीचा प्रवास उलगडणार आहे. रामदास फुटाणे सादर करीत असलेल्या `भारत कधी कधी माझा देश आहे` या कार्यक्रमाला चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत, त्याअनुषंगानेही फुटाणे बोलतील. प्रसिद्ध अभिनेते सागर तळाशीकर आणि कवी अरुण म्हात्रे मुलाखत घेतील. सोमवारी २५ ऑगस्टला सकाळी दहा वाजता उत्सवाचे उदघाटन होईल. हिदीतील ज्येष्ठ कवयित्री गगन गिल यांच्या हस्ते आणि अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली उदघाटन समारंभ होईल. हिंदीतील ज्येष्ठ कवी डॉ. बोधिसत्त्व, ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. त्यानंतरच्या सत्रामध्ये गगन गिल यांची मुलाखत विजय चोरमारे तर डॉ. बोधिसत्त्व यांची मुलाखत टिकम शेखावत घेतील. प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक यांची मुलाखत दुपारी दोन वाजता होणार असून सौमित्र पोटे त्यांच्याशी संवाद साधतील. `मणिपूर समजून घेताना` आणि `महामुद्रा` या दोन सध्याच्या चर्चित पुस्तकांच्यासंदर्भात त्यांचे लेखक अनुक्रमे शाहू पाटोळे आणि धनंजय बिजले यांची मुलाखत डॉ. आलोक जत्राटकर घेतील. 
सायंकाळी चार वाजता नामवंत कवींची काव्यमैफल रंगणार आहे. त्यामध्ये सौमित्र उर्फ किशोर कदम, अरुण म्हात्रे, आभा बोधिसत्त्व, मोनिका सिंग, संदीप माळवी, सुमती लांडे, अभिनेता मिलिंद शिंदे, प्रशांत मोरे, प्रकाश होळकर, संजीवनी तडेगावकर आणि अपूर्व राजपूत सहभागी होतील.
ख्यातनाम साहित्यिक शंकर पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्यानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने विशेष सत्राचे आयोजन केले आहे. डॉ. राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या सत्रामध्ये नामदेव माळी यांचे शंकर पाटील यांच्या साहित्यावर व्याख्यान होईल. शंकर पाटील यांच्या कथेचे कथाकथन बाबासाहेब परीट करतील. अभिनेते मिलिंद शिंदे एका कथेचे अभिवाचन करतील. तिसरी घंटा या रंगकर्मी समूहाच्यावतीने `पाळणा` या कथेवरील एकांकिका सादर केली जाईल. `कथा अकलेच्या कांद्याची` या नाटकातील प्रवेश शिवाजी विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी सादर करतील.साहित्य उत्सवामध्ये सर्व साहित्यप्रेमींसाठी विनामूल्य प्रवेश आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes