अजित पवारांचे जंगी स्वागत करणार, दौऱ्याची राष्ट्रवादीकडून जय्यत तयारी ! पुईखडी ते सडोली खालसा मोटारसायकल रॅली!!
schedule21 Aug 25 person by visibility 469 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी (२५ ऑगस्ट २०२५) कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पवारांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. तसेच पुईखडी ते सडोली खालसापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. या दौऱ्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांनी केले.
दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश पाटील हे आपल्या गटासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीमध्ये सडोली खालसा येथे हा पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवारी (२१ ऑगस्ट) मार्केट यार्ड येथील पक्ष कार्यालयात बैठक झाली. जिल्हाध्यक्ष पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, कार्याध्यक्ष अनिल साळोखे , महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे, बाजार समितीचे उपाध्यक्ष राजाराम चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक झाली.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘ राहुल पाटील व राजेश पाटील या बंधुंसह कै. पी. एन. पाटील गटाच्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद निश्चितच वाढणार आहे. आगामी केडीसीसी बँक, गोकुळ दूध संघ, शेतकरी सहकारी संघ, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका. तसेच; ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पक्षाला फार मोठे पाठबळ मिळणार आहे.पीएन गटाच्या सर्वच कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सन्मानाची वागणूक मिळेल. पक्षाकडून जुना नवा असा भेद न करता आम्ही सर्वजण एकदिलाने काम करू. सडोली खालसा येथील पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी २५ हजार कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहणार आहेत.’
जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘जिल्ह्यात पक्षाच्या सभासद नोंदणीचे काम सुरू आहे. आतापर्यत कागल तालुका आघाडीवर आहे. इतर तालुक्यातही सभासद नोंदणी सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जण पक्षात प्रवेश करत आहेत. सप्टेंबर महिन्यात आणखी काही जणांचा पक्षात प्रवेश होणार आहे. ’पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनय पाटील इचलकरंजी शहराध्यक्ष सुहास जांभळे, अमित गाताडे, पंडितराव केणे, मधुकर जांभळे, बाळासाहेबद देशमुख, संभाजी पाटील, संभाजी पवार, संतोष धुमाळ, विश्वनाथ कुंभार, शिवाजी देसाई, विकास पाटील, सुनील गाताडे, , निहाल कलावंत, प्रमोद पवार, पूजा साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा युवक अध्यक्ष नितीन दिंडे आदी उपस्थित होते.