पंचगंगा सरकतेय धोका पातळीकडे, कोल्हापुरला पुराचा धोका ! ३५ नागरिकांचे स्थलांतर, पाच हॉस्पिटल्सना नोटिस, नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली!!
schedule21 Aug 25 person by visibility 215 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागात पुराचा धोका वाढला आहे. पंचगंगा नदी इशारा पातळीकडून धोका पातळीकडे सरकत आहे. रात्री बारा वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी ४२ फुटापर्यत पोहोचली. ४३ फुटाला धोका पातळी आहे. पहाटे पाच ते रात्री बारा या १९ तासाच्या काळात पंचगंगा नदीची पाणी पातळी तीन फुटांनी वाढली. जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन शिवारात पाणी पसरल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. बुधवारी शहरातील काही भागात पुराचे पाणी शिरले. गायकवाडा वाडा पुतळया समोरील रस्त्यावर पाणी पसरले आहे. त्या पाठोपाठ दसरा चौक परिसरातील सुतारवाडा येथे पुराचे पाणी शिरल्याने या परिसरातील नऊ कुटुंबांचे चित्रदुर्ग मठ येथे स्थलांतरण केले आहे. नागाळा पार्क, कदमवाडी परिसरातील पाच हॉस्पिटल्सना रुग्णांना स्थलांतरित करण्याच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत.जोरदार पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नद्याच्या पाणी पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे. श्रीक्षेत्र नृसिंहवाड येथील दत्त मंदिर पुराच्या पाण्याखाली आहे. मंदिर व्यवस्थापनमार्फत मंदिरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. नदी काठावरील शेतपीके पाण्याखाली गेली आहेत. इचलकरंजीत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. इचलकरंजीहून हुपरी-रेंदाळकणडे जाणाऱ्या मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. जुना पूल पाण्याखाली आहे. जिल्ह्यातील ७९ बंधारे पाण्याखाली आहेत.
बुधवारी दिवसभरही पावसाची उघडझाप सुरू होती. अधूनमधून पावसाच्या मोठया सरी कोसळत होत्या. धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला तरी धरणातून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत. बुधवारी पहाटे पाच वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे ३९ फुटापर्यत पाणी पातळी वाढली. ३९ फूट ही इशारा पातळी मानली जाते. दरम्यान शहरातील पूरस्थिती लक्षात घेऊन महापालिकेची सर्व यंत्रणा सतर्क झाली आहे.चारही विभागीय कार्यालयातील सर्व निवारा केंद्रे सज्ज ठेवली आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सुतारवाडा परिसरात नदीचे पाणी नागरी वस्तीजवळ पोहोचल्याने सुरक्षेच्या दृष्टीने एका कुटुंबाला चित्रदुर्ग मठ येथील महापालिकेच्या निवाराकेंद्रामध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी स्वतः सुतारमळा परिसराला भेट देऊन तेथील नागरिकांना स्थलांतरीत करण्याचे आदेश दिले. चित्रदुर्ग मठ येथे ९ कुटुंबे स्थलांतरित केली आहेत.सुतारवाडा येथील एकूण ३५ नागरिकांचा समावेश आहे. याम्घ्ध्ये पुरुष नऊ, महिला अकरा, तर लहान मुले व मुली पंधरा आहेत.
पूरस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बुधवारी रात्री कसबा बावडा-शिय रोड तसेच गायकवाड वाडयाजवळ पाहणी केली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, तहसिलदार स्वप्नील रावडे यांच्यासह महसूल व पोलिस अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी उपाययोजनेच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना सूचना केल्या. कसबा बावडा-शिये रस्त्यावर पाणी आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. मुसळधार पावसामुळे कोल्हापूर –रत्नागिरी मार्गावर केर्ली येथे कासारी नदीचे पाणी आले आहे.तसेच केर्ली फाटा ते वडणगे फाटा दरम्यानच्या परिसरात देखील पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक शिवाजी पूल-वडणगे फाटा-वडणगे-निगवे दुमाला-जोतिबा रोड- वाघबीळ-रत्नागिरी मार्ग असा वळविला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग मोठया प्रमाणात होत आहे. यामध्ये राधानगरी धरणातून ८६४० क्युसेक्स, दूधगंगा धरणातून १८६०० क्युसेक्स, वारणातून २४०९० क्युसेक्स तर कोयना धरणातून ९५३०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.