नको बाजार समित्या, नको सेस ! व्यापारी-व्यावसायिक आंदोलनाच्या पावित्र्यात !! चेंबरच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी मांडली भूमिका
schedule09 Jan 25 person by visibility 50 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘बाजार समिती (एपीएमसी) स्थापण्यामागील मूळ उद्देश हा बाजूला पडला आहे. शेतकऱ्यांसाठी स्थापलेल्या या समितीत एकही शेतकरी प्रतिनिधीत्व करताना दिसत नाही. शेतकऱ्याचे हित आणि व्यापार-व्यवसायाला चालना यापेक्षा बाजार समित्या या राजकीय कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनाचे ठिकाण ठरल्या आहेत. भ्रष्टाचाराचे अड्डे बनले आहेत. सरकारने बाजार समित्या बंद कराव्यात. यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स राज्यभर आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. नो एपीएमसी, नो सेस ही आमची भूमिका आहे. ’अशी स्पष्ट भूमिका चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड, मुंबई येथील चेअरमन मोहन गुरनानी व चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडचे अध्यक्ष दीपेन आगरवाल यांनी कोल्हापुरात मांडली.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळयासाठी ते, गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. सकाळी त्यांच्या उपस्थितीमध्ये दिगंबर जैन बोर्डिंग येथे व्यापारी-व्यावसायिकांचा मेळावा झाला. या मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयावर स्पष्टपणे मते मांडली. एलबीटी हटविण्यासाठ व्यापाऱ्यांनी ज्या एकसंधपणे लढा दिला, तशी एकजूट पुन्हा एकदा बाजार समिती रद्द करण्यासाठी दाखवावी लागणार आहे. बाजार समिती स्थापन करताना बाळगलेला व्यापक उद्देश आता बाजूला सारला आहे. बाजार समित्या या राजकीय पुनर्वसनाचे ठिकाण बनले आहेत. भ्रष्टाचाराच्या अड्डा असे स्वरुप लाभले आहे. बाजार समितीतंर्गत आकारणार सेस कोणाच्या फायद्याचा आहे ? समितीच्या आवारात पायाभूत सुविधा नाहीत. मुळात व्यापार-व्यवसाय विषयक कोणताही प्रश्न असो, त्याच्या सोडवणुकीसाठी संघटित शक्ती हवी. संघटित शक्तीमुळेच एलटीबी हटला असे गुरनानी यांनी सांगितले. सरकार कोणाचेही असो, संघटितपणा असल्याशिवाय दबाव निर्माण होत नाही. असेही ते म्हणाले.
आगरवाल म्हणाले, ‘एलबीटीचे असेसमेंटवरुन व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. २०१५ मध्ये एलबीटी रद्द झाली. असेसमेंटसाठी पहिल्यांदा पाच वर्षे व त्यानंतर दोन वर्षे अशी दोनदा मुदतवाढ दिली. २०२२ नंतर पुन्हा असेसमेंट कशासाठी सुरू आहेत ? व्यापारी, व्यावसायिकांना त्रास देण्याचा हा उद्योग आहे. एलबीटी विभागच सरकारने रद्द करावा. यासाठी सरकारशी चर्चा सुरू आहे. इॅ कॉमर्सविषयी सरकारने स्पष्ट धोरण आखण्याची गरज आहे. सध्या मार्केटिंगचा ट्रेंड बदलत आहे. किरकोळ व्यापाऱ्यांनी बदलत्या बाजारपेठवर लक्ष ठेवत व्यापार व्यवसायासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. ग्राहकांना सेवा पुरवाव्यात. यासाठी प्रबोधन सुरू आहे. राज्यात ठिकठिकाणी महापालिकेच्या गाळेधारकांचा व भाडेआकारणीचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्नशील आहे. ’ पत्रकार परिषदेला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, संचालक संपत पाटील, जयेश ओसवाल, अजित कोठारी आदी उपस्थित होते.